अध्याय अठ्ठावीसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा भक्तिभावाने माझे ध्यान केले असता योगसाधनेत येणाऱ्या सर्व अडचणींचे, विघ्नांचे निर्दालन होते. आधिव्याधी, सर्व विघ्ने, विकल्प, विकर्म, देहाभिमान, ज्ञानाभिमान हे सर्व केवळ माझे ध्यान केल्याने जळून नष्ट होतात. साधकांना सर्व सृष्टीत कुणी त्रास देणारा म्हणून उरत नाही. माझे ध्यान करण्याचा नाद लागला की, अडचणींना जागाच रहात नाही. सर्व विघ्नांचा नाश झाल्याने मनात विकल्प म्हणून रहात नाहीत. उद्धवाने हे सगळे ऐकले.
भगवंतांचे मनोभावे ध्यान केल्याने सर्व विघ्ने दूर पळून जातील ह्याची त्यालाही खात्री होती परंतु माणसाचे मन अतिशय चंचल असल्याने ते एका जागी स्थिर करणे हे कर्मकठीण काम आहे हे तो जाणून होता. त्यामुळे ध्यान करण्यासाठी आवश्यक असलेली एकाग्रता कशी साधायची हे काही त्याच्या लक्षात येईना. भगवंत आपल्या मनातले विचार तत्काळ ओळखतात हे तोही जाणून होता. त्यामुळे आपल्या मनातल्या शंकेचेउत्तर ते कसे देतात ह्याची तो उत्सुकतेने वाट पाहू लागला. भगवंतानीही उद्धवाचे मनोगत लगेच ओळखले. त्याच्या मनातल्या पण त्याने बोलून न दाखवलेल्या शंकेचे उत्तर ते देऊ लागले. ते म्हणाले, उद्धवा, गीतेत योगाभ्यासाबद्दल मी अर्जुनाशी बोलत होतो तेव्हाही अर्जुनाने हीच शंका मला विचारली होती. त्याने विचारले होते, तू बोलिलास जो आता साम्य-योग जनार्दना । न देखे स्थिरता त्याची ह्या चंचळ मनामुळे । 6.33 । मन चंचळ हे कृष्णा हट्टी छळितसे बळे । धावे वार्यावरी त्याचा दिसे निग्रह दुष्कर । 6.34 ।
अर्जुन आणि श्रीकृष्ण हे एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र होते. त्यामुळे एकमेकांशी बोलताना त्यांच्यात कोणताही आडपडदा किंवा कसं बोलू, काय बोलू असा प्रश्न येत नसे. त्यामुळे अर्जुनाने सरळ सरळ सांगितले की, जनार्दना तू जो आत्ता साम्ययोग सांगितलास ना, तोच मुळी मला प्रत्यक्षात आणता येईल असे वाटत नाही आणि असे वाटण्याचे कारण म्हणजे माणसाचे मन एव्हढे चंचल असते की, त्याला एका जागी गप्प बसवणे हे महाकर्मकठीण काम आहे कारण ते वाऱ्याच्या वेगाने इकडे तिकडे धावत असते आणि हट्टाने माणसाला अनेक संकल्प विकल्पाने छळत असते. अर्जुनाने आपण सांगितलेल्या गोष्टीवर सहमत न होता वेगळे मत नोंदवले ह्याबद्दल भगवंतांना राग आला नाही कारण मित्रामित्रात असे चालत असते. अध्यात्मात भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत. त्यातील भक्तराज अर्जुन करत असलेल्या भक्तीला सख्यभक्ती असे म्हणतात.
जाता जाता हेही लक्षात घ्यावे लागेल की, उद्धव हाही अर्जुनाच्या तोडीचाच श्रेष्ठ भक्त होता परंतु तो करत असलेल्या भक्तीच्या प्रकाराला दास्यभक्ती असे म्हंटले जाते. आता अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तराकडे वळू. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, तू म्हणतोयस तसं मन चंचल आहे हे खरेच पण अभ्यास आणि वैराग्य ह्या दोन गोष्टींच्या सहाय्याने मनाला स्थिर करता येते. मनावर ताबा असल्याशिवाय हे जमत नाही परंतु संयमवंतास प्रयत्नाने हे साध्य होते. अवश्य मन दु:साध्य म्हणतोस तसे चि ते । परी अभ्यास-वैराग्ये त्याचा निग्रह होतसे। 6.35 । संयमाविण हा योग न साधे मानितो चि मी । परी संयमवंतास उपाये साध्य होतसे। 6.36।
अर्थात अर्जुन किंवा उद्धवासारख्या श्रेष्ठ भक्तांना हे जमण्यासारखे आहे परंतु सर्वसामान्य भक्तांचा उद्धार होण्याच्या दृष्टीने उद्धवाशी बोलताना मन स्थिर करण्यासाठी नामसंकीर्तनाचा उपाय भगवंत सांगत आहेत. ते उद्धवाला म्हणाले, एका जागी आसन घालून मनाला एकाग्र करून माझ्यावर लक्ष केंद्रित केल्यावर विघ्ने बाधत नाहीत हे खरेच आहे परंतु एकाग्र होऊन माझे ध्यान करणे ही सोपी गोष्ट नाही हे पटण्यासारखे आहे म्हणून मी तुला गीतेत अर्जुनाला सांगितला त्यापेक्षा वेगळा उपाय सांगतो तो ऐक, जर भक्ताने माझे नामसंकीर्तन मनापासून केले तर त्यामुळेसुद्धा विघ्नांचा सर्वनाश होतो.
क्रमश: