चौथ्या दिवशी नेमबाजाकडून दोन गोल्ड, तीन रौप्य व दोन कांस्यपदकाची कमाई
वृत्तसंस्था/ होंगझाऊ
आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथ्या दिवशी (बुधवारी) भारतीय नेमबाजांनी शानदार प्रदर्शन करताना दोन सुवर्णपदकासह तब्बल सात पदके मिळवली. बुधवारी सकाळी 3 मुलींच्या पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांनी देशाला सुवर्णपदकाची कमाई करून दिली आहे. मनू, ईशा आणि रिदम यांनी 25 मीटर अंतरावरून असे लक्ष्य साधले की इतर देशांचे नेमबाज त्यांच्यासमोर टिकू शकले नाहीत. याच जोरावर महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तसेच भारताच्या सिफ्ट कौर समरा हिने महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन या वैयक्तिक स्पर्धेत वर्चस्व राखून जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले आहे. तर आशी चोक्सीने याच प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली. याशिवाय, सेलिंगमध्ये विष्णूने शानदार कामगिरीसह कांस्यपदक जिंकले तर महिला हॉकीत भारताने सिंगापूरला नमवत विजयी सलामी दिली.
तीन लेकींची कमाल
25 मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत भारताने चीनला तीन गुणांनी हरवले. भारताच्या मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी 1759 गुण मिळवले. नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या तीन मुलींमध्ये मनू भाकरने सर्वाधिक 590 गुण मिळवले. या सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले तर चीनच्या संघाने 1756 गुणांसह रौप्यपदक तर दक्षिण कोरियाच्या संघाने 1742 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. मनू, इशा व रिदम यांनी शानदार प्रदर्शन करताना सुवर्णमय कामगिरी साकारली.
सिफ्त सामराला विक्रमासह गोल्ड
बुधवारी भारताच्या सिफ्त कौर सामराने 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. तिने 469.6 स्कोअर करत विश्वविक्रमालाही गवसणी घातली. तिने अंतिम फेरीत ब्रिटनच्या सायनेड मॅकिन्टोशचा 467.0 गुणांचा विश्वविक्रम 2.6 गुणांनी सुधारला. विशेष म्हणजे, महिला 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारातील हा सर्वोच्च विक्रमी स्कोअर आहे. दरम्यान, याच प्रकारात भारताच्याच आशी चौक्सीने कांस्यपदक जिंकले. तिने 451.9 स्कोअर केला. चीनच्या क्यूआयनगे झांग हिने 462.3 स्कोअरसह रौप्यपदक जिंकले.
महिलांच्या 50 मी रायफल 3 पोझिशन प्रकारात रौप्य
आशी चौक्सी, मानिनी कौशिक आणि सिफ्त कौर या भारतीय नेमबाजी त्रिकूटाने बुधवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. 1754 गुणांसह भारताने स्पर्धेत रौप्यपदक मिळवले, जे सुवर्णपदकापेक्षा फक्त 19 गुणांनी कमी होते. 1773 गुणांसह सुवर्णपदक चीनला मिळाले. दक्षिण कोरियाने 1756 गुणांसह रौप्यपदक जिंकले.
पुरुषांच्या सांघिक स्कीटमध्ये भारताला कांस्यपदक
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांची बुधवारी कामगिरी अप्रतिम अशी राहिली. दरम्यान, बुधवारी दुपारच्या सत्रात पुरुषांच्या सांघिक स्कीटमध्ये भारताने कांस्यपदक पटकावले. टीम इंडिया 355 च्या स्कोअरसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या कझाकिस्तानशी बरोबरीत होती. यानंतर भारताने पुनरागमन करत पदक निश्चित केले. अनंत नारुका, गुरजित सिंग आणि अंगद बाजवा यांनी भारतासाठी पदक जिंकले. मात्र, अनंतला वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारता आली नाही. या प्रकारात चीनने गोल्ड तर कतारने रौप्यपदकाला गवसणी घातली.
भारताच्या अनंतची रुपेरी कामगिरी
पुरुषांच्या स्कीट एकेरीत भारताने तब्बल 49 वर्षांनंतर पदक जिंकले आहे. या स्पर्धेत अनंतजित सिंगने चमकदार कामगिरी करत 49 वर्षांचा दुष्काळ संपवला. अनंतजीतने पुरुषांच्या स्कीट स्पर्धेत 58 गुणांसह रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत कुवेतच्या 60 वर्षीय अब्दुल्ला अल रशिदीने 60 पैकी 60 गुण मिळवत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली. अनंतजीतने पहिल्या दहा सिरीजमध्ये लक्ष्याचा अचून वेध घेतला. शेवटच्या 5 सिरीजमध्ये त्याचे फक्त दोन शॉट मिस झाले. त्याने अब्दुल्ला यांच्यावर चांगलाच दबाव निर्माण केला होता. मात्र अब्दुल्लांनी अखेर सुवर्ण पदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, भारताच्या अनंतजीतचे हे मोठ्या स्पर्धेमधील पहिलेच वैयक्तिक पदक आहे.
18 वर्षाच्या इशाची कमाल, 25 मी पिस्तूल प्रकारात जिंकले रौप्य
महिलांच्या 25 मी पिस्तूल प्रकारात सांघिक गटात सुवर्ण जिंकल्यानंतर याच प्रकारात वैयक्तिक गटात इशा सिंगने 34 गुणासह रौप्यपदकाची कमाई केली. चीनच्या लिऊ रुईने 38 गुणासह सुवर्ण तर कोरियाच्या जिनने 26 गुणासह कांस्यपदक जिंकले. 18 वर्षीय इशा केवळ चार गुणामुळे सुवर्णपदकापासून दूर राहिली. अंतिम फेरीत काही चुका झाल्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सेलिंगमध्ये विष्णूला कांस्य
विष्णू सरवननने सेलिंगमध्ये पुरुषांच्या डिंगी घ्थ्ण्A 7 मध्ये 34 च्या नेट स्कोअरसह कांस्यपदक जिंकले. कोरियाच्या हा जिमीनने 33 गुणांसह रौप्यपदक जिंकले, तर सिंगापूरच्या लो जून हान रायनने 26 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या सिंगल डिंगी घ्थ्ण्A6 मध्ये नेत्रा कुमनाना चौथ्या स्थानावर राहिली. विशेष म्हणजे, सेलिंगमध्ये (नौकायन) एकूण स्कोअरमधून खेळाडूंचा सर्वात वाईट स्कोअर वजा केला जातो आणि नेट स्कोअर काढला जातो. सर्वात कमी नेट स्कोअर मिळवणारा खेळाडू विजेता ठरतो.
वुशूमध्ये भारताचे रौप्य पक्के
दरम्यान, वुशू क्रीडा प्रकारात 60 किलो गटात महिला खेळाडू रोशिबिना देवीने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन साकारताना अंतिम फेरी गाठली. बुधवारी झालेल्या उपांत्य लढतीत तिने व्हिएतनामच्या ति नाग्युमनचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. आता, अंतिम लढतीत तिच्यासमोर चीनच्या वु झियोवेईचे आव्हान असेल.
टेनिसमध्ये एकेरीत भारतीय खेळाडूंना रिक्त हस्ते परतावे लागले. मात्र दुहेरीत भारतीय जोडीने उपांत्य फेरी गाठत पदक निश्चित केले आहे.
निखत झरीन उपांत्यपूर्व फेरीत, शिव थापा बाहेर
बॉक्सिंगमध्ये दोन वेळ वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या भारताच्या निखत झरीनने शानदार खेळ साकारताना 50 किलो गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. बुधवारी झालेल्या लढतीत तिने दक्षिण कोरियाच्या की चोरोंग बाकला 5-0 असे हरवले. दुसरीकडे, पुरुषांच्या 57 किलो गटात भारताचा अनुभवी बॉक्सर शिव थापाला अस्कट कुल्ताएवने 5-0 असे तर 92 किलो गटात संजीतला उझबेकिस्तानच्या लजीजबेकने हरवले.
भारताला आज 8 पदके (7 नेमबाजी, 1 नौकानयन)
- सिफ्ट कौर सामरा (नेमबाजी) – सुवर्ण
- 25 मीटर पिस्तूल सांघिक (महिला) – सुवर्ण
- 50 मी रायफल 3 पोझिशन सांघिक (महिला) – रौप्य
- इशा सिंग 25 मी पिस्तूल – रौप्य
- आशी चौकसे, 50 मी रायफल 3 पोझिशन – कांस्य
- नेमबाजी स्कीट टीम (पुरुष) – कांस्य
- नेमबाजी स्कीट वैयक्तिक, अनंतजीत सिंग – रौप्य
- विष्णू (नौकानयन) – कांस्य