केवळ विद्युत खांब उभे करून कंत्राटदार गायब
बेळगाव : नानावाडी-सावगाव रोडवर पथदिपांसाठी खांबांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र सहा महिने उलटले तरी त्या ठिकाणी पथदीपच लावण्यात आले नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी अपघात घडण्याची शक्यता आहे. याचबरोबर इतर अनुचित प्रकारदेखील घडत आहेत. तेव्हा तातडीने पथदीप बसवावेत, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. नानावाडी ते सावगाव रस्त्यावर पथदीप बसविण्यासाठी विद्युत खांबांची उभारणी करण्यात आली आहे. उभारणी करून बारा महिने उलटले. मात्र आजतागायत पथदीपच लावण्यात आले नाहीत. त्यामुळे हे विद्युत खांब शोभेसाठी उभारण्यात आले आहेत का? असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. अंधार पडत असल्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहेत. रात्रीच्यावेळी ये-जा करणे अवघड जात आहे. तेव्हा महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि पथदीप बसवावेत, अशी मागणी होत आहे.