अर्धा लिटरला 2 दोन रुपयांसह 10 मिली जादा दूध
बेळगाव : नंदिनी दूध व दही दरात 1 ऑगस्टपासून वाढ करण्यात आली आहे. प्रतिलिटर 3 रुपये दर वाढविण्यात आला आहे. या दरवाढीचा फायदा दूध उत्पादकांना होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दूध दरवाढीचा प्रस्ताव होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत 21 जुलै रोजी झालेल्या केएमएफच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. अर्धालिटर दूध पाकिटावर 1 रुपये 50 पैसे वाढविण्यात आले आहेत. मात्र, चिल्लरची समस्या लक्षात घेऊन 10 मिली अतिरिक्त दूध देऊन 2 रुपये वाढविण्यात आले आहेत. अर्धालिटर दुधाच्या पाकिटावर जादा 10 मिली असा उल्लेख करण्याची सूचना केएमएफला करण्यात आली असून मंगळवार दि. 1 ऑगस्टपासूनच नवा दर अंमलात आला आहे. लम्पिस्कीन रोगामुळे दूध उत्पादनात घट झाली होती. राज्यातील सुमारे 35 हजारहून अधिक दूध उत्पादकांनी या व्यवसायातून माघार घेतली होती. सध्या रोज 10 लाख लिटर दुधाचे उत्पादन कमी झाले आहे. दुग्ध व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी दरवाढ करण्यात आली आहे.