वृत्तसंस्था/ पुणे
पोलंडमधील पॉझनन येथे सुरू असलेल्या विश्व नौकायन चषक-2 दिव्यांगांच्या नौकायन स्पर्धेत भारताचे पॅरा नौकानयनपटू के.नारायण आणि कुलदीप सिंग यांनी पीआर 3 पुरूषांच्या पेयर प्रकारात कांस्यपदक पटकाविले. गेली पाच वर्षे ही जोडी एकत्रितपणे विविध स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत असून त्यांचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय कास्यपदक आहे.
पीआर-3 पुरूषांच्या पेयर नौकानयन प्रकारात नारायण आणि कुलदीप यांनी 7 मिनिटे, 33.35 सेकंदाचा अवधी घेत कांस्यपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारात फ्रान्सच्या हॅमेलीन आणि कॅडोटने 6 मिनिटे, 52.08 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर युक्रेनच्या सॅव्हेक आणि हेरेझ यांनी 7 मिनिटे, 29.20 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक पटकाविले. भारताच्या नारायण आणि कुलदीप यांनी 2019 साली पोलंडमध्ये झालेल्या स्पर्धेत पहिले कांस्य तर त्यानंतर म्हणजे 2019 च्या अखेरीस दक्षिण कोरियात झालेल्या स्पर्धेत दुसरे कांस्यपदक मिळविले होते. दोन वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे अतिरेक्यांनी केलेल्या सुरूंग स्फोटामध्ये नारायण आणि कुलदीप यांना आपले पाय गमवावे लागले होते.