सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बेन्नू अंतराळातून सुखरुपपणे पृथ्वीवर दाखल
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
नासाने रविवारी ‘ओसिरिस रेक्स’ मोहिमेतून एक मोठी उपलब्धी मिळवली. बेन्नू लघुग्रहाचा नमुना घेऊन अमेरिकन स्पेस एजन्सीचे एक कॅप्सूल पृथ्वीवर सुखरुपपणे उतरले आहे. या कॅप्सूलमध्ये असलेल्या नमुन्यात लघुग्रहावरील सुमारे 250 ग्रॅम खडक आणि माती आहे. पृथ्वीवर आलेले नमुने शास्त्रज्ञांना सौरमालेच्या उत्पत्तीबद्दल अधिक माहिती मिळवण्यास मदत करणार आहेत. या यशासाठी नासाला सात वर्षे प्रतीक्षा करावी लागली.
बेन्नू लघुग्रहाचा नमुना घेऊन नासाची एक पॅप्सूल रविवारी रात्री पृथ्वीवर उतरली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री 8.22 वाजता पॅराशूटद्वारे ते उटाहच्या वाळवंटात उतरवण्यात आले. हे वाळवंट यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सच्या यूटा टेस्ट आणि टेनिंग रेंज अंतर्गत येते. जेव्हा हे कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात शिरले तेव्हा त्याचा वेग ताशी 44,498 किलोमीटर होता. हा वेग बंदुकीतून सोडलेल्या गोळीच्या 15 पट जास्त मानला जातो. या यशाबद्दल नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी ‘ओसिरिस रेक्स’ मोहिमेतील वैज्ञानिकांच्या टीमचे अभिनंदन केले. या मोहिमेतून नासाने मोठे यश संपादन केल्याचे नासाने म्हटले आहे.
‘ओसिरिस रेक्स’ मोहिमेने सात वर्षांपूर्वी 2016 मध्ये उड्डाण केल्यानंतर 2018 मध्ये बेनू लघुग्रहाभोवती फिरण्यास सुऊवात केली. अंतराळ यानाने 2020 मध्ये नमुना गोळा केला. या मोहिमेने शेवटी मे 2021 मध्ये पृथ्वीच्या दिशेने दीर्घ प्रवास सुरू केला होता. या मोहिमेदरम्यान गेल्या सात वर्षात एकूण 6.22 अब्ज किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाल्याची माहिती नासाने सोमवारी दिली.