लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी यांच्याकडून आयोजन
नाशिक : प्रख्यात गझल गायक पंकज उधास यांच्या मखमली आवाजात ‘चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल, और आहिस्ता कीजिये बातें, कोई सुन रहा होगा’ या सारख्या अजरामर गझलचा आनंद घेत नाशिककरांची रात्र गझलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीकडून ‘टाइमलेस पंकज उधास लाइव्ह गझल’ मैफलीचे आयोजन येथील महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये केले होते. यावेळी पंकज उधास यांच्या पहिल्या गझलपासून टाळ्या, शिट्ट्या आणि फर्माईश सांगत मैफलीला सुरुवात झाली. पुढे टाळ्यांची साथ मिळत उत्तरोत्तर मैफल रंगत गेली. विशेष म्हणजे नाशिककरांच्या फर्माईश पूर्ण करतच पंकज उधास यांनी मैफलीची सांगता केली. यावेळी अनेक गझल वन्समोअर ठरल्या. मनाचा ठाव घेत प्रेम, विरह, आनंद, उत्साह, दु:ख, एकाकीपणा या मानवी भावनांचा वेध घेत मैफल रंगली होती. ‘चिठ्ठी आयी है’ म्हणायला सुरुवात केली आणि समोर खचाखच भरलेल्या श्रोतृवर्गाला जणू आजच्यापुरते आपले संचितच गवसले… ज्या अपेक्षेने आलो होतो, ती या गझलसम्राटाने पुरेपूर पूर्ण केली, अशी भावना रसिकांनी बोलून दाखवली. पंकज उधास यांनी ‘साजन’मधले ‘जिये तो जिये कैसे’ म्हणायला सुरुवात करताच वाजणाऱ्या टाळ्यांचे रुपांतर शिट्ट्यांत झाल्याचे पाहायला मिळाले. पुढे ‘दिवारों से मिलकर रोना अच्छा लगता है, कुछ ऐसा घर चाहिए मुझ को जिस की फसा मस्ताना हो, निकलो ना बे नकाब जमाना खराब है, थोडी थोडी पिया करो’ अशा अनेकांच्या फर्माईशीही गाऊन पंकज उधास यांनी नाशिककरांना तृप्त केले.