जिल्ह्यात 35 टक्के इतकी फूलशेती
कोल्हापूर विद्याधर पिंपळे
फुलाशिवाय कोणताच घरगुती, सार्वजनिक कार्यक्रम होत नाही. त्यामुळे फुलांना नियमित मागणी आहे. आता, नैसर्गिक फुलापेक्षा कृत्रिम, प्लास्टीक फुलांचा वापर वाढू लागला आहे. इव्हेंट कंपन्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आता 80 टक्के प्लास्टीक फुलांचा वापर होऊ लागला आहे. त्याचा परिणाम नैसर्गिक फूल शेती व नर्सरी व्यवसायावर होऊ लागला आहे. मजुरांचा अभाव, फुलांच्या दरातील चढ-उतार, नर्सरीत परप्रांतीयांचा शिरकाव आदी कारणांमुळे प्लास्टीक फुलांचा वापर वाढल्याने, स्थानिक नर्सरी व फूलशेती कोमेजण्याच्या मार्गावर आहे.
धार्मिक सण, विवाह, बारसे, वाढदिवस, सत्कार आदी कार्य
क्रमात फुलांचा वापर वाढला आहे. पण ताजी फुले उपलब्ध होत नसल्याने, त्यांचे उत्पादन कमी असल्याने कृत्रिम फुलांना मागणी वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मोगरा, झेंडू, जलबेरा, शेवंती, निशिगंध, गुलाब आदी फुलांची शेती मोरेवाडी, उचगांव, राशिवडे, जयसिंगपूर आदी भागामधून केली जात आहे. सणसमारंभ, व्हॅलेंटाईन डे च्या काळात जिल्ह्यातील गुलाब फुले मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जात आहेत. सणासुदीच्या काळात फुलांना चांगला दर मिळतो. जिल्ह्यात 35 टक्के इतकी फुल शेती होत असल्याने उत्पन्नही चांगले मिळत होते, असे सांगण्यात आले.
नर्सरी व्यवसाय हा इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन प्रकारामध्ये घेतला जात आहे. आता निसर्गाच्या लहरीमुळे तयार फुलझाडे नाहीशी होऊन, शेतकऱ्यांसह व्यापारी तसेच इव्हेंट व्यवसायाला आर्थिक फटका बसू लागला आहे. नर्सरी व्यवसायमध्ये झेंडू, शेवंती, कापरी, जरबेरा, गुलाब, करनशन वेलवर्गीय ग्रास व बुकेमध्ये वापरले जाणारे पत्तेही तयार केले जातात. पण आता नैसर्गिक फुलापेक्षा आता प्लास्टीक फुलांची क्रेझ वाढू लागली आहे. अशा फुलांना वास नसल्याने, हात लावल्याशिवाय त्याची सत्यता समजत नाही. यासाठी एकदाच गुंतवणूक करावी लागत असल्याने, तसेच नाशवंत नसल्याने, अशा प्लास्टीक फुलांची मागणी बाजारपेठेत वाढत चालली आहे.
दिल्ली, मुंबई येथून प्लास्टीक फुले, पाने आवक होत आहे. कोल्हापुरात बाजार गेट येथे अशा प्लास्टीक फुले, पानांची मोठी बाजारपेठ झाली आहे. आज इव्हेंट कंपन्याकडून नैसर्गिक फुलांपेक्षा प्लास्टीक फुलांची मागणी वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारामध्ये प्लास्टीकची फुले मोठ्या प्रमाणावर विक्रीस येऊ लागली आहेत. प्लास्टीकची फुले ही खऱ्या फुलांसारखी दिसू लागल्याने
ग्राहकही प्लास्टीकची फुले विकत घेऊ लागले आहेत. त्यामुळे फुलांची नैसर्गिक शेती अडचणीत आली आहे.
फुलांचा वापर फक्त गाभाऱ्यातच
प्लास्टीक फुलांची बाजारपेठ जोमात असल्याने, शेतीमधील फुलांचा वापर कमी झाला आहे. फक्त विवाहामधील वधू-वर, पूजा, सत्कार, तसेच मंदिरांमधील गाभाऱ्यामध्येच फुलांचा वापर केला जात आहे. इतर कार्यक्रमांमध्ये प्लास्टीक फुलांचा वापर होत आहे. आता इव्हेंट व्यवसायामध्ये 80 टक्के इतका प्लास्टीक फुले, पानांचा वापर होऊ लागला आहे.