भक्ती भावाने दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना
वार्ताहर/ कराड
घरोघरी घटस्थापना करून आदीशक्तीचा जागर करणाऱया नवरात्रोत्सवास सोमवार पासुन मोठय़ा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. सार्वजनिक मंडळांमध्ये मोठय़ा भक्तिभावाने दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावर्षी निर्बंधमुक्त नवरात्रोत्सव साजरा होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
गणेशोत्सवानंतर वेध लागलेल्या नवरात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ झाला. आदीशक्तीचा जागर करणाऱया दुर्गोत्सवाची महिला वर्गाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. घरोघरी घटस्थापना केल्यानंतर सोमवारी पहिली माळ अर्पण करण्यात आली.
येथील बालाजी मंदिरासमोरील मैदानातून दुर्गादेवीच्या मूर्ती नेण्यासाठी सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महिला वर्गांकडून दुर्गा देवीच्या मूर्तीला साडी व साजशृंगार करण्यात येत होता. अनेक मंडळांनी ढोल ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात दुर्गादेवीच्या मूर्ती मंडळात नेल्या. भक्तिभावाने दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मूर्ती नेण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहार पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नवरात्रोत्सवासाठी लागणारे पूजेच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.