आयएनएस विक्रमादित्य-विक्रांत पहिल्यांदाच एकत्र
सर्वात मोठ्या सरावात 35 लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, पाणबुड्या सहभागी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात मोठा युद्धसराव हाती घेतला असून अलिकडच्या वर्षांतील हे एक मोठे शक्तिप्रदर्शन मानले जात आहे. लढाऊ पराक्रमाच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनांमध्ये त्याचा समावेश असून त्यात दोन विमानवाहू जहाजे, अनेक युद्धनौका, पाणबुड्या आणि 35 हून अधिक फ्रंटलाईन विमानांचा समावेश आहे. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या वाढत्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने हा मोठा सराव सुरू केला आहे.
नौदलाची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य आणि आयएनएस विक्रांत हे सरावाचे मुख्य आकर्षणबिंदू आहेत. मिग-29के आणि एमएच60आर या दोन्ही हेलिकॉप्टर्ससह कामोव्ह आणि प्रगत हलक्या हेलिकॉप्टरच्या उ•ाण आणि लँडिंगसाठी या युद्धनौकांचा वापर करण्यात आल्याचे भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी येथे सांगितले. शनिवारी अरबी समुद्रातील सरावावेळी दोन्ही युद्धनौकांनी एकत्रितपणे फ्लोटिंग एअरफील्ड म्हणून अचूकपणे कार्य निभावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विमानवाहू युद्धनौका सीबीजी (पॅरिअर बॅटल ग्रुप) ऑपरेशन्स अलीकडेच आयोजित करण्यात आल्या होत्या, असे भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सरावाची तारीख न जाहीर करता सांगितले.
समुद्रात दोन विमानवाहू युद्धनौका तसेच जहाजे आणि पाणबुड्यांच्या अखंड कसरतींचे एकत्रिकरण हे समुद्र-आधारित हवाई शक्तीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा आणि भारतातील प्राधान्य सुरक्षा भागीदार म्हणून भारताच्या भूमिकेचा एक शक्तिशाली पुरावा असल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे वाहक युद्ध गट किंवा स्ट्राईक गट हा एक मोठा नौदल ताफा असून त्यामध्ये विमानवाहू जहाज, विनाशक, फ्रिगेट्स आणि इतर जहाजे असतात.
भारतीय नौदलाने अरबी समुद्रात 35 हून अधिक विमानांसह दुहेरी वाहक सीबीजी ऑपरेशन्स आयोजित केल्या होत्या. या माध्यमातून विशाल सागरी विस्तारामध्ये सतत हवाई संचालन सुनिश्चित करणे, भारताच्या सामरिक क्षमता वाढवणे आणि राष्ट्रीय हिताचे रक्षण करण्याची वचनबद्धता अधोरेखित करणे आदी उद्दिष्ट्यो साध्य झाल्याचे भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी सांगितले. भारताने आपली सुरक्षा यंत्रणा मजबूत करत असतानाच देशाच्या संरक्षण रणनीतीला आकार देण्यासाठी आणि प्रादेशिक स्थैर्याला चालना देण्यासाठी विमानवाहू जहाजे अत्यंत महत्त्वाची ठरतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
‘आयएनएस विक्रांत’ची चोख कामगिरी
गेल्या महिन्यात मिग-29 के लढाऊ विमानाने ‘आयएनएस विक्रांत’वर नाईट लँडिंग केले होते. याप्रसंगी विमानवाहू युद्धनौका इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी भूमिका बजावू शकेल, असे नौदलाने म्हटले होते. तसेच गेल्यावषी सप्टेंबरमध्ये विमानवाहू युद्धनौका कार्यान्वित करताना 40,000 टन वरील श्रेणीतील विमानवाहू जहाजे तयार करण्यास सक्षम राष्ट्रांच्या उच्च गटाचा भाग बनवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.
‘आत्मनिर्भर’ला बळ
सुमारे 23,000 कोटी ऊपये खर्चून बांधलेल्या आयएनएस विक्रांतमध्ये प्रगत हवाई संरक्षण नेटवर्क आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. यात 30 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर ठेवण्याची क्षमता आहे. जहाजाच्या कमिशनिंग समारंभात पंतप्रधानांनी त्याला ‘तरंगते शहर’ असे संबोधत ते संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत असल्याचे प्रतिबिंब असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार नौदलाच्या अरबी समुद्रातील शक्तिप्रदर्शनातून पंतप्रधानांच्या या वक्तव्याला बळ मिळाले आहे.