मनपाच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेतही अनेकवेळा झाला नियमांचा भंग : शहरातील समस्यांबाबत नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेचे सभागृह चालविणे हे मोठे काम असते. जसे विधानसभा पेंवा विधान परिषदचे कामकाज असते, त्याचप्रकारे महापालिकेचेही सभागृहामध्ये काम चालले पाहिजे. हे चालविताना महापौरांनी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत. मात्र बुधवारी झालेल्या सभेमध्ये अधिकारीच उत्तरे देत होते. तर काही अधिकाऱ्यांनी माहितीच आणली नव्हती. त्यामुळे एक प्रकारे गोंधळ सुरू होता. हा संपूर्ण प्रकार पाहता महापौरांसह सर्व नगरसेवकांनाही सभागृह कशा प्रकारे चालते? याचे मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
याबाबत माजी महापौर आणि ज्येष्ठ वकील नागेश सातेरी म्हणाले, महापालिकेची सभा असेल तर नगरसेवकांना किमान 7 दिवस आधी नोटीस दिली पाहिजे. नोटीस देताना सभेचा अजेंडाही पाठविला पाहिजे. त्यानंतर सभागृहामध्ये अजेंड्यानुसार आलेल्या प्रश्नांवर महापौरांनीच उत्तरे दिली पाहिजेत. कोणताही ठराव पास करताना सभागृहात अस्तित्वात असलेल्या नगरसेवकांचे मत ऐकून त्यानंतर तो ठराव मंजूर केला पाहिजे. मात्र बुधवारच्या सभेमध्ये असा शिस्तपणा दिसूनच आला नाही. त्यामुळे सभागृह कसे चालते, तसेच सभागृहामध्ये कोणते ठराव कशा प्रकारे मांडायचे, याचे मार्गदर्शन होण्याची गरज निर्माण झाली आहे.
कामकाजात अनेक त्रुटी
बुधवारी महापालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र या सभेचे कामकाज करताना अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले. महापौर शोभा सोमणाचे यांचा हा पहिलाच कार्यकाळ आहे. बहुसंख्य नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनाही कामाचा अनुभव कमी आहे. त्या नगरसेवकांना सभेबाबतची माहिती दिली पाहिजे. अन्यथा बेशिस्तपणा सुरूच राहणार आहे. अजेंड्यामध्ये असलेल्या प्रश्नांवर नगरसेवकांचे मत विचारून घेतले पाहिजे. किती जणांनी विरोध केला आहे, तसेच कितींनी त्याला पाठिंबा दिला आहे, हे देखील पाहिले पाहिजे. त्यानंतर तो ठराव पास केला पाहिजे.
शहरातील कोणत्याही प्रश्नावर नगरसेवकांनी आपले मत व्यक्त केले पाहिजे. त्यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत त्या सांगितल्या पाहिजेत. कोणताही ठराव करताना भविष्यात त्यापासून सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही, याचीही जाणीव पाहिजे. त्यासाठी नगरसेवकांनीही त्यावर अभ्यास करणे गरजेचे आहे. बऱ्याचवेळा काहीजण विरोध करतात. त्यांचा विरोधदेखील ऐकून घेतला पाहिजे. त्यानंतर तो ठराव मंजूर केला पाहिजे.
बुधवारी झालेल्या सभेमध्ये कोणताही ठराव सर्वानुमते पास करताना त्याबाबत चर्चा करून ठराव बहुमताने पास झाल्याचे दिसून आले नाही. केवळ आसनावर बसून टेबल बडवून ठराव पास करण्यावरच भर देण्यात आला. अधिकाऱ्यांनी तर कोणतीच माहिती त्याठिकाणी आणली नव्हती. त्यामुळे सर्व काही पुढील बैठकीत पाहू, असे सांगून वेळ मारून नेल्याचे दिसून आले. सर्वात कहर म्हणजे सभागृह सुरू असताना कायदा सल्लागार तेथे उपस्थित असणे देखील चुकीचे असल्याचे मत माजी महापौर नागेश सातेरी यांनी मांडले.
अजेंड्यामध्ये असलेल्या प्रश्नांबाबत नगरसेवकांनीही अभ्यास केला पाहिजे. त्यामध्ये असलेल्या त्रुटीदेखील सभागृहामध्ये दाखवून दिल्या पाहिजेत. अजेंड्याव्यतिरिक्त शहरामध्ये कोणतीही समस्या असेल तर ती लक्षवेधी समस्या म्हणून त्यावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे. अन्यथा केवळ ठराव करायचा आणि त्याला मान्यता द्यायची, याशिवाय कोणत्याच प्रक्रिया होणार नाहीत, हे देखील तितकेच खरे आहे. त्यासाठी सर्वांनी आपली मते मांडून त्यानंतर ठराव पास केला पाहिजे.