खानापूर महिला फेडरेशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : नगरसेवकांचा पक्षपातीपणा नडला
बेळगाव : खानापूर शहरातील मारुतीनगर परिसरातील विकासकामांकडे नगरपालिकेकडून साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या भागात विकासकामे राबविताना भेदभाव केला जात आहे. जाणीवपूर्वक विकासकामे करण्यात टाळले जात आहे. याची त्वरित दखल घेऊन रहिवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय महिला फेडरेशन खानापूर शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. खानापूर शहरातील मारुतीनगर येथील गल्ली नं. 1 व 3 मध्ये गेल्या दहा वर्षापासून रस्ते नाहीत. या भागातील नागरिकांकडून नगरपालिकेला कर भरला जात असला तरी सुविधा पुरविण्याकडे पक्षपातीपणा केला जात आहे. नगरसेवकांच्या पक्षपाती भूमिकेमुळे रहिवाशांना सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याचा आरोप रहिवाशांतून केला जात आहे. आपले नातलग असलेल्या 2 नं. गल्लीमध्ये विकास कामे राबविली जात आहेत. मात्र याच भागात येणाऱ्या गल्ल्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत नगरसेवकांना विचारले असता निधी नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे.
समर्पक उत्तरे मिळत नसल्याने नाराजी
याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता समर्पक उत्तरे मिळत नसल्याचे दिसून येत आहे. इतर भागात विकास कामे राबविण्यासाठी फंड असताना या भागात विकासकामे राबविण्यासाठी फंड का नाही, गेल्या दहा वर्षांपासून रस्ते व गटारी नसल्याने नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. या भागात खर्च करण्यात आलेल्या निधीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महिला फेडरेशनकडून करण्यात आली आहे. या भागात असणाऱ्या रहिवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी उमादेवी माने, अॅड. एम. एल माने, सुगंधा तेंगेण्णावर, उज्ज्वला उशीणकर, संजना करंबळकर, कौसल्या रजपूत आदी उपस्थित होत्या.