डावात 300 पेक्षा जास्त धावा काढणारा पहिला संघ
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
नेपाळच्या फलंदाजांनी बुधवारी येथे आशियाई खेळांत तीन विश्वविक्रम मोडीत काढत टी-20 मध्ये 300 पेक्षा जास्त धावा जमविणारा पहिला संघ बनण्याचा मान प्राप्त करून दिला. कुशल मल्ला या 19 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने 34 चेंडूंत टी-20 तील सर्वांत जलद शतक झळकावले आणि डेव्हिड मिलर आणि रोहित शर्मा यांच्या नावावर संयुक्तपणे असलेला मागील विक्रम (35 चेंडूंत शतक) मोडीत काढला.
तिसऱ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करताना मल्लाने 12 षटकार आणि आठ चौकार हाणून नाबाद 137 धावा झोडपल्या आणि नेपाळला मंगोलियाविऊद्ध 3 बाद 314 अशी सर्वोच्च टी-20 धावसंख्या उभारून दिली. मंगोलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले होते. नेपाळचा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज दीपेंद्र सिंग आयरीनेही यावेळी नवा विक्रम नोंदविला. नऊ चेंडूंत अर्धशतक ठोकून युवराज सिंगचा 16 वर्षांचा विक्रम त्याने मोडीत काढला.
युवराज सिंगने 19 सप्टेंबर, 2007 रोजी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंडविऊद्धच्या सामन्यात 58 धावा काढताना 12 चेंडूंत अर्धशतक झळकावले होते. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील डावातील सर्वोच्च धावसंख्येचा यापूर्वीचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर होता. त्यांनी 23 फेब्रुवारी, 2019 रोजी आयर्लंडविऊद्ध 3 बाद 278 धावा केल्या होत्या.