31 मार्चपूर्वी पॅन लिंक करणे अनिवार्य : कंपनीकडून नवीन लिंक सादर
वृत्तसंस्था/ मुंबई
एलआयसीने आता पॉलिसीधारकांसाठी पॅन लिंक करणे अनिवार्य केले आहे. यावेळी एलआयसीने म्हटले आहे की सर्व पॉलिसी धारकांनी 31 मार्च 2023 पूर्वी पॉलिसीशी त्यांचे पॅनकार्ड लिंक करणे आवश्यक आहे. आपल्या ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन, एलआयसीकडून एक लिंक सादर करण्यात आली आहे.
या लिंकचा वापर करुन ग्राहकांना आपले पॅन लिंक करणे अगदी सोपे होणार आहे. प्राप्तिकर विभागाने याआधी ग्राहकांना आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड बँक खात्याशी, आधार कार्ड आदी लिंक करण्याची सूचना केली आहे. आता एलआयसीने आपल्या सर्व ग्राहकांना त्यांच्या सर्व पॉलिसींसोबत पॅन लिंक करण्यास सांगितले आहे.
एलआयसीने ग्राहकांसाठी https://licindia.in/Home/Online-PAN-Registration लिंक उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये लिंकिंग करताना, पॉलिसीधारकाने पॅन क्रमांक आणि पॉलिसी क्रमांक सोबत ठेवणे आवश्यक आहे. ग्राहक एकाच वेळी अनेक पॉलिसी पॅनशी लिंक करू शकतात, त्यांना प्रत्येक पॉलिसीसाठी स्वतंत्र लिंकिंग प्रक्रिया करण्याची गरज नाही.
पॉलिसीला असे करावे पॅन लिंक
एलआयसी पॉलिसीधारकांना प्रथम एलआयसी वेबसाइट https//licindia.in/ ला भेट देता येऊन नंतर ऑनलाइन सेवा विभागात ऑनलाइन पॅन नोंदणी पर्यायावर क्लिक करता येईल. एलआयसी ग्राहक https://licindia.in/Home/Online-PAN-Registration या लिंकला देखील भेट देऊ शकतात. यानंतर पॅनला आपल्या एलआयसी पॉलिसीशी लिंक करण्याचे पेज उघडेल. येथे 3 बिंदूंमधील सूचना आहेत, त्या वाचल्यानंतर खाली ‘पुढे जा’ वर क्लिक करा. यानंतर एक नवीन पेज उघडेल, ज्यामध्ये आवश्यक माहिती समाविष्ट करा- जन्मतारीख, ईमेल, पॅन क्रमांक, नाव, मोबाइल क्रमांक, पॉलिसी क्रमांक. ग्राहकांना एकापेक्षा जास्त पॉलिसी क्रमांक जोडता येतात.