उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे गौरवोद्गार : सेंगोलची स्थापना : 75 रुपयांचे नाणे जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नवीन संसद भवन देशाला समर्पित केले. पंतप्रधानांनी रीतिरिवाजांसह पूजा केल्यानंतर लोकसभेच्या कक्षेत प्रथम सेंगोलची स्थापना केल्यानंतर तामिळनाडूतील 20 पंडितांचे आशीर्वाद घेतले. कार्यक्रमादरम्यान मोदींनी श्र्रमयोगींचा सन्मान करण्याबरोबरच सर्वधर्म सभाही घेतली. यानंतर अनेक मंत्री आणि दिग्गजांसह पंतप्रधानांनी नव्या संसदेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाषणही केले. तसेच पंतप्रधानांनी 75 ऊपयांचे नाणे जारी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीत नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी सकाळी साडेसात वाजता धोती-कुर्ता घालून नवीन संसद भवनात पोहोचले. राष्ट्रपिता महात्मा गांधींना नमन आणि सावरकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केल्यानंतर ते हवन-पूजनाला बसले. सुरुवातीला पंतप्रधानांनी सेंगोलला साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर तामिळनाडूतील संतांनी ते मोदींना सुपूर्द केले. यानंतर पंतप्रधानांनी सभागृहात सभापतींच्या आसनाशेजारी सेंगोल लावले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते. सेंगोलच्या स्थापनेनंतर “आजचा दिवस आपल्या सर्व देशवासियांसाठी अविस्मरणीय आहे. नवीन संसद भवन आपल्या सर्वांना अभिमानाने आणि आशेने भरून टाकणार आहे”, असे ट्विट पंतप्रधानांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात समारंभाच्या दुसऱ्या सत्रात पंतप्रधानांचे भाषण झाले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री, खासदार आणि मान्यवर पाहुणे सभागृहात उपस्थित होते. त्यांना सेंगोलवरील एक व्हिडिओही दाखवण्यात आला. यानंतर मोदींचे भाषण झाले. नवीन संसद भवनाच्या बांधकामात कामगारांनी घाम गाळला आहे. आपण सर्व खासदारांनी आपल्या कार्याप्रती समर्पित भावनेने ही इमारत दिव्य बनवायची आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी सर्व संसद सदस्यांना केले. लोकशाहीच्या या सुवर्ण क्षणासाठी मी सर्व भारतीयांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान म्हणाले. ही केवळ एक इमारत नाही, तर ती 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. जगाला भारताच्या निर्धाराचा संदेश देणारे हे भारताच्या लोकशाहीचे मंदिर असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
नवीन संसद भवनाचे बांधकाम क्षेत्र 64,500 चौरस मीटर आहे. ते बनवताना 60 हजार मजुरांना थेट रोजगार मिळाला आहे. व्यवस्थापनाकडून प्रकल्पाशी संबंधित मजुरांपर्यंत 23 लाखांहून अधिक मनुष्य-दिवसांचा रोजगार निर्माण झाला. डिसेंबर 2020 मध्ये सुरू झालेले त्याचे बांधकाम सुमारे अडीच वर्षांत पूर्ण झाले आहे. ही देखील एक उपलब्धी असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.
910 कारागीर स्किल इंडियाद्वारे प्रमाणित
भारताच्या प्रगतीचे आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवीन संसद भवनासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्किल इंडियाकडून 910 कारागिरांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सुतारांचे कौशल्य प्रशिक्षण वाढवणे आणि प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. त्यांनी नवीन संसद भवनात लोकसभेत 888 आणि राज्यसभेत 384 सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. तसेच संयुक्त अधिवेशनादरम्यान लोकसभा भवनात 1,272 सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था आहे.
भव्य संविधान सभागृह, तीन गॅलरी
नवीन संसद भवनात एक भव्य संविधान सभागृह बांधण्यात आले आहे, ज्यामध्ये भारताची प्राचीन संस्कृती, लोकशाही परंपरा प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यासोबतच नवीन संसद भवनात खासदारांसाठी विश्रामगृह, विविध समित्यांसाठी खोल्या, जेवणाची जागा आणि पुरेशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. संगीत दालनात देशाची वैशिष्ट्यापूर्णता दिसून येत असून क्राफ्ट गॅलरीत दगड, धातू, लाकूड ते कपड्यांपर्यंतच्या कारागिरीची झलक पाहायला मिळत आहे.
मजबूत सुरक्षा व्यवस्था
नवीन संसद भवनात थर्मल इमेजिंग सिस्टीम आणि फेस रेकग्निशन सिस्टीम असलेले पॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे संशयास्पद क्रियाकलाप रोखण्यास मदत करतात. हा संपूर्ण परिसर सीसीटीव्हीनेही सज्ज आहे. या सुविधेमुळे संदिग्ध व्यक्तीने संसद भवन परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तरी तो पकडला जाईल. कोणताही हॅकर येथील उपकरणे फोडू शकत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. नवे संसद भवन एक निर्दोष सायबर प्रणालीने सुसज्ज आहे. या प्रणालीला ‘अत्याधुनिक सायबर सुरक्षा’ असे नाव देण्यात आले आहे.
स्वप्न साकार…
रोजगार निर्मिती : 23,04,095 मनुष्य दिवसात
थेट रोजगार : 60,000 कामगार
बांधकाम क्षेत्र : 64,500 चौ. मीटर
स्टील : 26,045 मेट्रिक टन
सिमेंट : 63,807 मेट्रिक टन
फ्लाय एŸश : 9,689 क्मयूबिक मीटर
बांधकाम प्रारंभ : डिसेंबर 2020
उद्घाटन सोहळा : 28 मे 2023