जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येतून घेतला धडा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येचा धडा घेत केंद्र सरकारने व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत राज्यांना नवे सुधारित दिशानिर्देश जारी केले आहेत. या 5 कलमी नियमावलीत व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत अतिदक्ष राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये समोरून तसेच मागच्या बाजूनेही सुरक्षेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. शिंजो आबे यांच्यावर तरुणाने मागून गोळय़ा झाडल्या होत्या. 8 जुलै रोजी जपानमध्ये माजी पंतप्रधानांची हत्या झाल्यानंतर काही दिवसांतच केंद्र सरकारच्यावतीने राज्यांना व्हीव्हीआयपी लोकांची विशेष काळजी घेण्यासाठी नवी नियमावली पाठवण्यात आली आहे.
राज्यांना पाठविण्यात आलेल्या ऍडव्हायझरीमध्ये पाच मुद्यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये मागील बाजूने व्हीव्हीआयपींची सुरक्षा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला आहे. जेव्हा व्हीव्हीआयपी मंचावर बसतात तेव्हा मागून सर्व लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात यावेत, असे केंद्राने म्हटले आहे. विशेषतः रॅलींमध्ये अशी व्यवस्था करायला हवी. खरे तर व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेमध्ये सर्वाधिक लक्ष त्यांच्या पुढच्या भागावर असल्यामुळे अनेक वेळा मागच्या बाजूने सुरक्षेकडे दुर्लक्ष होण्याची शक्मयता असते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. हे पाहता केंद्राने या मुद्यावर भर दिला आहे.
व्हीव्हीआयपींजवळ गर्दी होऊ नये यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, असेही केंद्र सरकारने पत्रात म्हटले आहे. व्हीव्हीआयपींच्या जवळ कोण येतेय यावर बारीक नजर ठेवा. व्हीव्हीआयपीकडे जाणाऱया रस्त्यांची कसून चौकशी करून तिथून येणाऱया लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले पाहिजे. सुरक्षा कर्मचाऱयांनादेखील व्हीव्हीआयपींजवळ जाण्याची परवानगी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे सरकारने म्हटले आहे. व्हीव्हीआयपींच्या जवळ राहणाऱया लोकांचीही कसून चौकशी झाली पाहिजे. सुरक्षा कर्मचाऱयांनी तेथे नेहमी उपस्थित राहून जवळच्या लोकांवरही लक्ष ठेवले पाहिजे, असे नियमावलीत स्पष्ट केले आहे. तसेच व्हीव्हीआयपींच्या सामानाचीही वेळोवेळी तपासणी करण्यात यावी, असे या पत्रात म्हटले आहे. त्याशिवाय दुर्घटना-घातपात घडल्यास वेळप्रसंगी व्हीव्हीआयपींना सुरक्षितपणे रुग्णालयात कसे घेऊन जायचे, याबाबतही आराखडा अगोदरच तयार करायला हवा, असेही सुचित करण्यात आले आहे.