विश्वचषकासाठी उपलब्ध होणार की नाही हे पुढच्या आठवड्यात ठरणार
वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टिम साऊदीच्या दुखापतग्रस्त उजव्या अंगठ्यावर आज गुरुवारी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाणार आहे. गेल्या आठवड्यात इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात झेल घेण्याच्या प्रयत्नात साऊदीच्या उजव्या हाताचा अंगठा मोडला तसेच निखळला होता.
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांना आशा आहे की, हा 34 वर्षीय वेगवान गोलंदाज 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील संघाच्या सुरुवातीच्या सामन्यासाठी वेळेत बरा होईल. ही शस्त्रक्रिया फलदायी ठरेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यामध्ये काही पिन किंवा स्क्रू घातले जातील आणि ही प्रक्रिया यशस्वी झाली, तरी सरावासाठी परतताना आणि खेळताना टिमला वेदना सहन कराव्या लागतील तसेच दुखापतीची नीट काळजी घ्यावी लागेल, असे स्टीड यांनी म्हटले आहे. विश्वचषकात गतविजेत्या इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचे 29 सप्टेंबर आणि 2 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामने होणार आहेत.
इंग्लंडविरुद्धचा आमचा विश्वचषकातील सलामीचा सामना गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये होणार आहेत. तोवर टिम साऊदी उपलब्ध होईल अशी आशा आम्ही बाळगली आहे. टिम हा आमच्या संघातील एक अत्यंत अनुभवी आणि महत्त्वाची व्यक्ती आहे. आम्ही त्याला या विश्वचषकातील मोहिमेचा भाग बनण्याची शक्य ती प्रत्येक संधी देऊ इच्छितो, असे त्यांनी सांगितले आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन देखील या वर्षाच्या सुरुवातीला ‘आयपीएल’च्या दरम्यान झालेल्या दुखापतीतून सावरत आहे आणि न्यूझीलंडच्या सुरुवातीच्या सामन्यासाठी तो उपलब्ध न होण्यची शक्यता आहे. विश्वचषकात सहभागी होणारे संघ 28 सप्टेंबरपर्यंत 15 खेळाडूंच्या संघात बदल करू शकतात. त्यानंतरच्या कोणत्याही बदलासाठी आयसीसीकडून मंजुरी घेणे आवश्यक असेल. न्यूझीलंडच्या विश्वचषक संघातील पाच खेळाडू तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सध्या बांगलादेशमध्ये गेलेले आहेत. ही मालिका आज गुरुवारपासून सुरू होणार आहे. इतर खेळाडू मंगळवारी भारतात येण्यासाठी रवाना होणार आहेत.