दोन्ही संघांची कामगिरी समान असली तरी किवींचे पारडे किंचित जड
वृत्तसंस्था/ कराची
यजमान पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार असून यातील पहिला सामना आज सोमवारी येथे होणार आहे. यावर्षी भारतात होणाऱया वनडे विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या डे-नाईट सामन्याला दुपारी 3 वाजता प्रारंभ होणार असून सोनी स्पोर्ट्स टेन 5 वरून त्याचे थेट प्रक्षेपण होईल.
या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडचा मॅट हेन्री दुखापतग्रस्त असल्याने खेळू शकणार नाही. तो मायदेशी परतला असून त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. या मालिकेआधी पाक व न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटींची मालिका झाली आणि दोन्ही सामने अनिर्णीत राहिल्याने मालिकाही बरोबरीत सुटली होती. मायदेशात अलीकडे झालेल्या तीनही कसोटी मालिका पाकला जिंकण्यात यश आलेले नाही. आठपैकी चार कसोटी त्यांनी गमविल्या. त्यात इंग्लंडकडून झालेल्या 3-0 व्हाईटवॉशचाही समावेश आहे. न्यूझीलंडलाही गेल्या सहा कसोटीत विजय मिळविता आलेला नाही. पाकचा कर्णधार बाबर आझमला मात्र आपला संघ वनडे मालिकेत चांगली कामगिरी करेल, असा विश्वास वाटतो.
‘आपला संघ हा व्हाईटबॉलचा उत्तम संघ असल्याचे दाखवून दिले असून या मालिकेपासून आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱया विश्वचषकाच्या तयारीला प्रारंभ करीत आहोत,’ असे बाबर म्हणाला. गेल्या वर्षी बाबरच्या संघाने नऊपैकी आठ वनडे सामने जिंकले. त्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियावर 2-1 अशा फरकाने मिळविलेल्या मालिकाविजयाचाही समावेश आहे. ‘आपल्या संघात भक्कम फलंदाज व स्वतःला सिद्ध केलेले गोलंदाज असल्याने आपला संघ या मालिकेत निश्चितच सरस कामगिरी करेल, असा मला विश्वास वाटतो,’ असेही बाबर म्हणाला.
पाकिस्तानला वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीची उणीव जाणवण्याची शक्यता आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यातून तो अद्याप पूर्ण सावरलेला नाही. याशिवाय अष्टपैलू शदाब खानच्या बोटाला प्रॅक्चर झाले असल्याने तोही या मालिकेत खेळू शकणार नाही. सलामीवीर फखर झमानच्या समावेशाने पाकची फलंदाजी मजबूत झाली आहे तर हॅरिस सोहेललाही दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा संधी देण्यात आली आहे.
2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमधील उपविजेत्या न्यूझीलंडनेही मागील वर्षी 16 पैकी 10 सामने जिंकले आहेत. केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील हा संघही तुल्यबळ आहे. पाकविरुद्ध त्यांनी चांगले वर्चस्व राखले असून या दोन संघात झालेल्या मागील 15 पैकी 12 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. विल्यम्सनने कसोटी कर्णधारपद अलीकडेच सोडले असून त्याने वर्ल्ड कपवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ‘पुढील दोन वर्षात दोन वर्ल्ड कप होणार असल्याने मी व्हाईटबॉल क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला,’ असे त्याने मागील महिन्यात म्हटले होते. यावर्षी वनडे वर्ल्ड कप व पुढील वर्षी टी-20 वर्ल्ड कप होणार असून या संदर्भात त्याने वरील विधान केले होते. पाक संघ हा एक बलवान संघ असून मायदेशातच खेळत असल्याने त्यांना येथील वातावरणाची पूर्ण जाणीव असणार, हे साहजिक आहे, असेही तो म्हणाला.
न्यूझीलंड संघात बोल्ट, जेमीसन, ऍडम मिल्ने विविध कारणासाठी या मालिकेसाठी उपलब्ध झालेले नाहीत. त्यात आता हेन्रीची भर पडली असल्याने त्यांची गोलंदाजी काहीशी कमकुवत झाली आहे. या मालिकेतील उर्वरित दोन सामने बुधवारी व शुक्रवारी होणार आहेत.