मीरपूर
न्यूझीलंडचा संघ सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यजमान बांगलादेशला विजयासाठी 255 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात न्यूझीलंडतर्फे ब्लंडेलने अर्धशतक झळकविले. त्यानंतर बांगलादेशचा डाव 41.1 षटकात 168 धावा आटोपला. या मालिकेत न्यूझीलंडने बांगलादेशवर 1-0 अशी आघाडी मिळविली. न्यूझीलंडतर्फे सोधीने 39 धावांत 6 गडी बाद केले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिवसरात्रीच्या या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 49.2 षटकात 254 धावावर रोखले. न्यूझीलंड संघातील ब्लंडेलने 66 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 68, निकोल्सने 6 चौकारांसह 49, सोधीने 3 षटकारांसह 35, जेमिसनने 3 चौकारांसह 20, अॅलेनने 2 चौकारांसह 12, बोवेसने 3 चौकारांसह 14, रविंद्रने 2 चौकारांसह 10, कर्णधार फर्ग्युसनने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 13 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे खलीद अहमद, मेहदी हासन मिराज यांनी प्रत्येकी 3 तसेच रेहमानने 2, हसन मेहमूद व नेसून अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या डावात 5 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात सलामीच्या तमीम इक्बालने 7 चौकारांसह 44, मेहमूदूल्लाने 1 षटकार आणि 4 चौकांरासह 49, नेसूम अहमदने 2 षटकार आणि 1 चौकारांसह 21, मेहदी हसनने 2 चौकारांसह 17 धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे सोधीने 39 धावात 6 तर जेमिसनने 2, फर्ग्युसन व मॅकोंची यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – न्यूझीलंड 49.2 षटकात सर्वबाद 254 (ब्लंडेल 68, निकोल्स 49, सोधी 35, जेमिसन 20, मॅकोंची 20, खलीद अहमद 3-60, मेहदी हसन मिराज 3-45, रेहमान 2-53, हसन मेहमूद 1-46). बांगलादेश 41.1 षटकात सर्वबाद 168 (तमीम इक्बाल 44, मेहमूदूल्ला 49, नेसून अहमद 21, सोधी 6-39, जेमिसन 2-32).