वृत्तसंस्था/ डब्लिन (आयर्लंड)
यजमान आयर्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने आयर्लंडचा केवळ एक गडय़ाने पराभव करत थरारक विजय नोंदविला. या विजयामुळे न्यूझीलंडने या मालिकेत विजयी सलामी दिली आहे. न्यूझीलंडच्या मायकेल बेसवेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने 50 षटकात 9 बाद 300 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 49.5 षटकात 9 बाद 305 धावा जमवित केवळ एक चेंडू बाकी असताना सामना जिंकला.
आयर्लंडच्या डावामध्ये हॅरी टेक्टरने शानदार शतक झळकविताना 117 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह 113 धावा जमविल्या. कर्टिस कॅम्परने 47 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 43, अँडी मॅकब्राईनने 58 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 39, सिमी सिंगने 19 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 30, टकेरने 22 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 26, डॉकरेलने 1 षटकार आणि 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. कर्णधार बॅलबिर्नी 9 धावांवर तर पॉल स्टर्लिंग 5 धावांवर बाद झाले. आयर्लंडच्या डावात 9 षटकार आणि 31 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे लॉकी फर्ग्युसन, टिकनेर आणि सोधी यांनी प्रत्येकी 2 तर मॅट हेन्री आणि फिलिप्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आयर्लंडच्या टेक्टरचे वनडे क्रिकेटमधील हे पहिले शतक आहे. टेक्टरचा हा 21 वा वनडे सामना होता.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या ग्युप्टिलने 61 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 51 धावा जमविल्या. ऍलेन, यंग, कर्णधार लॅथम आणि निकोल्स हे न्यूझीलंडचे चार फलंदाज लवकर बाद झाले. न्यूझीलंडचा निम्मा संघ 120 धावात तंबूत परतला होता. त्यानंतर मायकेल ब्रेसवेलने झंझावाती खेळी करत आपल्या संघाला केवळ एक चेंडू बाकी असताना थरारक विजय मिळवून दिला. संघाचे पाच फलंदाज बाद झाल्यानंतर ब्रेसवेलचे मैदानात आगमन झाले. ब्रेसवेलने शेवटच्या षटकात आक्रमक फटकेबाजी केली. या शेवटच्या षटकात न्यूझीलंडला विजयासाठी 20 धावांची जरुरी होती. यंगच्या या षटकातील पाचव्या चेंडूवर ब्रेसवेलने उत्तुंग विजयी षटकार खेचला. या षटकात ब्रेसवेलने 24 धावा घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. ब्रेसवेलने 82 चेंडूत 7 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 127 धावा झोडपल्या. ग्युप्टिलने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 51, लॅथमने 25 चेंडूत 3 चौकारांसह 23, फिलिप्सने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 38, सोधीने 1 षटकार आणि 1 चौकारासह 25 धावा जमविल्या. सोधी आणि ब्रेसवेल यांनी सातव्या गडय़ासाठी 63 धावांची भर घातली. फर्ग्युसन आणि ब्रेसवेल यांनी शेवटच्या गडय़ासाठी अभेद्य 64 धावांची भागिदारी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडच्या डावात 9 षटकार आणि 26 चौकार नोंदविले गेले. बेसवेलने शेवटच्या षटकात 4, 4, 6, 4, 6 अशा एकूण 24 धावा फटकावल्या. आयर्लंडतर्फे कॅम्फरने 3, ऍडेरने 2 आणि यंग, लिटल, मॅकब्राईन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः आयर्लंड 50 षटकात 9 बाद 300 (टेक्टर 113, मॅकब्राईन 39, कॅम्फर 43, टकेर 18, सिमी सिंग 30, फर्ग्युसन 2-44, टिकनेर 2-71, सोधी 2-62, हेन्री, फिलिप्स प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 49.5 षटकात 9 बाद 305 (ब्रेसवेल नाबाद 127, ग्युप्टिल 51, फिलिप्स 38, लॅथम 23, सोधी 25, कॅम्फर 3-49, ऍडेर 2-43, यंग, लिटल, मॅकब्राईन प्रत्येकी 1 बळी).