वृत्तसंस्था/ एडिनबर्ग (स्कॉटलंड)
न्यूझीलंड क्रिकेट संघाने यजमान स्कॉटलंडचा दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत एकतर्फी पराभव केला. शुक्रवारी या मालिकेतील झालेल्या दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडवर 102 धावांनी मोठा विजय मिळविला. या मालिकेत न्यूझीलंडकडून स्कॉटलंडचा व्हाईटवॉश झाला. न्यूझीलंडच्या मार्क चॅपमनला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले.
शुक्रवारच्या दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 254 धावा जमविल्या. त्यानंतर स्कॉटलंडने 20 षटकात 9 बाद 152 जमविल्याने त्यांना हा सामना 102 धावांनी गमवावा लागला. न्यूझीलंडतर्फे मार्क चॅपमन आणि मिचेल ब्रेसवेल यांची कामगिरी दर्जेदार झाली.
न्यूझीलंडच्या डावामध्ये दुसऱया षटकात सलामीचा फलंदाज ऍलेन केवळ 6 धावावर बाद झाला. तिसऱया क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या चॅपमनने क्लेवरसमवेत दुसऱया गडय़ासाठी 45 धावांची भर घातली.
तत्पूर्वी, ऍलन आणि क्लेवर यांनी सलामीच्या गडय़ासाठी 25 धावांची भागीदारी केली होती. डावातील सहाव्या षटकात क्लेवर बाद झाला. त्याने 16 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 28 धावा जमविल्या. चॅपमनने आक्रमक फटकेबाजी करत संघाच्या धावसंख्येला चांगलाच आकार दिला. चॅपमन आणि मिचेल यांनी तिसऱया गडय़ासाठी 6.3 षटकात 62 धावा झोडपल्या. मिचेलने 19 चेंडूत 3 षटकारासह 31 धावा जमवित तो 11 व्या षटकात तंबूत परतला. मार्क चॅपमन 15 व्या षटकात बाद झाला. त्याने केवळ 44 चेंडूत 7 षटकार, 5 चौकारासह 83 धावा झळकविल्या. ब्रेसवेलने 25 चेंडूत 3 षटकार, 8 चौकारासह नाबाद 61 तसेच निशमने 12 चेंडूत 3 षटकार, 1 चौकारासह 28 धावा जमविल्या. न्यूझीलंडला 254 धावापर्यंत मजल मारता आली. निशम आणि ब्रेसवेल यांनी पाचव्या गडय़ासाठी 79 धावांची भर घातली. न्यूझीलंडच्या डावात 18 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे गेव्हिन मेनने 44 धावात 2 तर हमजा ताहीर, ऍलेसेडर इव्हान्स व ग्रिवेस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या अचूक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. त्याने 20 षटकात 9 बाद 152 धावापर्यंत मजल मारली. कर्णधार बेरिंग्टनने 12 चेंडूत 1 षटकार, 3 चौकारासह 22, ख्रिस ग्रिवेसने 29 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 37, मुनसेने 14 चेंडूत 4 चौकारासह 19, लिकने 1 चौकारासह 14, वॅटने 1 चौकारासह 13 आणि मेनने 2 चौकारासह नाबाद 12 धावा जमविल्या. स्कॉटलंडच्या डावात 4 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे मिचेल रिपॉन आणि निशम यांनी प्रत्येकी दोन तर ब्रेसवेल, सिरेस, सँटेनर व सोदी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 20 षटकात 5 बाद 254 (चॅपमन 83, ब्रेसवेल नाबाद 61, क्लेवर 28, मिचेल 31, निशम 28, मेन 2-44), स्कॉटलंड 20 षटकात 9 बाद 152 (ग्रिवेस 37, बेरिंग्टन 22, मुनसे 19, निशम 2-9, रिपॉन 2-37).