वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने 17 सदस्यीय फुटबॉल संघाची घोषणा केली असून अनुभवी स्ट्रायकर सुनील छेत्री हा एकमेव ओळखीचा चेहरा आहे. मात्र प्रमुख प्रशिक्षकपद स्टिमॅच यांच्याकडेच राहणार का, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
अनेक महत्त्वाचे खेळाडू विविध क्लब्सचे आयएसएलमध्ये प्रतिनिधित्व करणार असल्याने या खेळाडूंना आशियाई स्पर्धेसाठी सोडण्यास क्लब्सनी नकार दिल्यामुळे एआयएफएफला नवोदित संघ निवडणे भाग पडले आहे. फेडरेशनने एकूण 22 खेळाडूंना निवडले होते. पण आशियाई स्पर्धा व आयएसएल स्पर्धेचे वेळापत्रक एकाच वेळी येत असल्यामुळे क्लब्सनी त्यांना मुक्त करण्यास नकार दिला. आयएसएल स्पर्धा 21 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे एआयएफएफने बरीच खटपट करून काहीसा कमी ताकदीचा संघ निवडला आहे. सुनील वगळता अन्य खेळाडू अननुभवी आहेत. भारतीय फुटबॉल संघ तीन दिवसानंतर चीनला प्रयाण करणार आहे. आशियाई स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय फुटबॉल संघ पुढीलप्रमाणे : गुरमीत सिंग, धीरज सिंग मोइरंगथेम, सुमित राठी, नरेंदर गेहलोत, अमरजित सिंग कियाम, सॅम्युअल जेम्स, राहुल केपी, अब्दुल रबीह अंजुकंदन, आयुष देव छेत्री, ब्राईस मिरांडा, अझफर नूरानी, रहिम अली, व्हिन्सी बॅरेटो, सुनील छेत्री, रोहित दानू, गुरकिरत सिंग, अनिकेत जाधव.