आस्कावाडा- मांद्रे येथील घटना ः वीजवाहिन्यांसाठी खोदलेला खड्डा ठरला कारणीभूत
प्रतिनिधी/ पेडणे
मांद्रे-चोपडे मार्गावर आस्कावाडा येथे ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघात आस्कावाडा मांद्रे येथील नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला. गौरी उर्फ सुप्रिया महेंद्र म्हामल (वय 28, मांद्रे) असे त्यांचे नाव आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली. वीजवाहिन्यांसाठी खोदकाम केलेले खड्डे या अपघाताला कारणीभूत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
सविस्तर माहितीनुसार, शनिवार दि. 22 रोजी सकाळी गौरी उर्फ सुप्रिया म्हामल आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी क्र. जी. ए. 11 एफ 9823 या वाहनाने कामाला जात होत्या. आस्कावाडा येथे जी. एö04-टी-1712 हा ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोर असलेल्या मातीवरून चाक घसरले सुप्रिया म्हामल खाली कोसळल्या. मागून येणाऱया ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. सुप्रिया म्हामल या मूळच्या बागायत पराष्टे पेडणे येथील सुभाष हरमलकर यांची कन्या. पाच महिन्यांपूर्वीच म्हणजे गेल्या मे महिन्यातच तिचा विवाह झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे मांदे आणि पराष्टे बागायत परिसरात शोककळा पसरली आहे.
पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी जाऊन अपघाताचा रितसर पंचनामा केला व मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविला. शवचिकित्सेनंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला. काल संध्याकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ट्रक चालकाला पेडणे पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
सध्या मांद्रे-चोपडे मार्गावर भूमिगत वीजवाहिन्या घालण्यासाठी रस्ता खोदकाम सुरू आहे. यामुळे मांदे पंचायत क्षेत्रातील आस्कावाडा ते मांदे मधलामाजपर्यंतचा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. खोदकाम केल्यानंतर न बुजवलेला चर व खड्डय़ामुळे गौरी म्हामल यांना आपला जीव गमवावा लागला, अशी प्रतिक्रिया स्थानिकांतून व्यक्त होत आहे.
ट्रक चालकासह केबल कंत्राटदारावरही गुन्हा दाखल करा ः सरपंच अमित सावंत
कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण नवविवाहितेचा हकनाक बळी गेला. या अपघातास ट्रकचालक व केबल कंत्राटदार यांना जबाबदार धरून दोघांवरही गुन्हा नोंद करावा, अशी मागणी मांद्रे सरपंच अमित सावंत यांनी केली. उद्यापर्यंत या रस्त्यावरील खोदलेले खड्डे व्यवस्थित बुजवल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मांद्रे पंचायत क्षेत्रात वीज केबल्स घालण्यासाठी सध्या रस्ता खोदकाम करण्याचे काम जोमाने सुरू आहे. मात्र कंत्राटदाराने पुरेशी दक्षता घेतली नसल्याने हा अपघात घडला आहे, अशी प्रतिक्रिया ऍड. प्रसाद शहापूरकर यांनी व्यक्त केली.