|Sunday, December 8, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘फेरारी की सवारी’मधील पक्याचे स्निफमधून पुनरागमन

‘फेरारी की सवारी’मधील पक्याचे स्निफमधून पुनरागमन 

‘फेरारी की सवारी’मधील पक्या, ‘नटसम्राट’मधील बुटपॉलिशवाला राजा, तर नुकत्याच आलेल्या मराठी सुपरहीट व्हेंटीलेटरमधील साई, म्हणून सर्वपरिचित असलेला निलेश दिवेकर, आता सुप्रसिद्ध दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्या आगामी ‘स्निफ’ या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी निलेश दिवेकर या अष्टपैलू अभिनेत्याने टीव्ही, नाटक आणि सिनेमा या माध्यमांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.

बालकलाकार म्हणून त्याने 800 हून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे श्रीमान श्रीमती, येसबॉस, लापतागंज, तारक मेहता का उलटा चष्मा, गुटरगू (सायलेंट कॉमिडियन) अशा दूरचित्रवाणी जगतातील अनेक यशस्वी विनोदी मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. शिवाय वास्तव, पिता, तेरा मेरा साथ रहे, विरुद्ध, फेरारी की सवारी अशा हिंदी तर कँडल मार्च, रेगे, सिंधुताई सकपाळ, व्हेंटीलेटर या मराठी चित्रपटांमधील त्याच्या भूमिका अत्यंत गाजल्या आहेत. मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या निलेशने बालमोहन विद्यामंदिरमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. नाटकांमधून बालकलाकार म्हणून काम करत त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. रुईया महाविद्यालयातून अर्थशास्त्रातली पदवी तर मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयात त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. बालमोहन विद्यामंदिरमधील शिक्षिका विद्या पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली निलेशने अभिनयाच्या क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली.

 

निलेश दिवेकर म्हणतो, सुपरस्टार अमिताभ बच्चन, संजय दत्त आणि अजय देवगण यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांसह काम करण्याच्या अनुभवामुळे माझा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. सिनेजगतात अनेक वर्षे काम केल्यानंतर, नेहमीच समीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरणाऱया लहान मुलांच्या भावविश्वावरील सिनेमे बनवणाऱया अमोल गुप्ते यांच्याबरोबर काम करण्याची मला नेहमीच इच्छा होत होती. सुदैवाने तशी संधी मला मिळाली. अमोल गुप्ते यांनी दिग्दर्शन केलेल्या स्निफ या चित्रपटात माझी पुढील भूमिका पाहायला मिळणार आहे. हा ऍक्शन ऍडव्हेंचर सिनेमा असून त्यात मी रहस्यपूर्ण विनोदी भूमिका साकारली आहे.

Related posts: