|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सहकार टिकविण्यासाठी सरकार कटीबद्ध : मंत्री सुभाष देशमुख

सहकार टिकविण्यासाठी सरकार कटीबद्ध : मंत्री सुभाष देशमुख 

आजरा साखर कारखान्यावर शेतकरी मेळावा

प्रतिनिधी/ आजरा

महाराष्ट्रातील सामान्य माणसांना बळ देण्याचे काम सहकाराने दिले आहे. सहकार ही सामान्य माणसांची चळवळ असून सहकार टिकविण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले. आजरा साखर कारखान्यातील साखर पोती पूजन व शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके होते.

कारखान्याचे चेअरमन अशोक चराटी यांनी स्वागत करून प्रास्ताविकात यावर्षी तालुक्यातील साखर उत्पादना 50 टक्के घट झाली आहे. गतवर्षी पाणी उपलब्ध असून पाटबंधारे विभागाने पाणी दिले याचा फटका शेतकरी आणि कारखान्याला बसल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यातील उचंगी, आंबेओहोळ व सर्फनाला या प्रकल्पांची कामे 80 टक्केपेक्षा अधिक झाली असून धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह ही कामे पूर्ण केल्यास पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. यासाठी शासनाने लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केले.

यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार, ऊस विकास स्पर्धेतील विजेते शेतकरी, वसंतदादा शुगर इन्स्टीटय़ूट मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या शेतकऱयांचा सत्कार करण्यात आला. सिनेअभिनेत्री अंशुमाला पाटील यांच्या अंशुमाला पाटील प्रतिष्ठाणच्यावतीने महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री देशमुख म्हणाले, कोल्हापूर जिल्हा ही सहकारची पंढरी आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभीच आपल्याला आजऱयातील उत्त्कृष्ट सहकारी संस्था पाहण्याचे भाग्य लाभले. आजरा साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पासाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. ऊसासाठी उपलब्ध पाणी पुरविणे शक्य होण्याकरीता जास्तीतजास्त ठिबकसिंचन करण्याची सूचना करून त्यासाठी साखर कारखान्याने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

तालुक्यातील रखडलेले प्रकल्प हे 80 टक्केपेक्षा अधिक काम पूर्ण झालेले आहेत. असे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासन गांभिर्याने विचार करीत आहे. यामुळे या प्रकल्पांचे काम लवकरच पूर्ण होईल. शेतकऱयांनी आपल्या जमीनीला नेमके कोणते अन्नद्रव्य पाहिजे याची माहिती करून घेण्यासाठी मातीपरीक्षण करून घ्यावे अशी सूचनाही त्यांनी दिली. आजरा तालुक्यातील सहकारी संस्था आदर्श असून या संस्थांना आपले सर्वतोपरी मदत राहील असे आश्वासन मंत्री देशमुख यांनी दिले.

यानंतर आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजयबाबा घाटगे, अंशुमाला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात शेळके यांनी शासन आजरा साखर कारखान्याच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कारखान्याच्या व्हा. चेअरमन सौ. सुनिता रेडेकर, गोकुळचे संचालक रवींद्र आपटे, सभापती विष्णुपंत केसरकर, आजरा अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, संचालक विश्वनाथ करंबळी, दिगंबर देसाई, दशरथ अमृते यांच्यासह संचालक उपस्थित होते. कार्यकारी संचालक पी. एल. हरेर यांनी आभार मानले.

भाजपमध्ये नाही पण भाजपासोबत आहे : अशोक चराटी

तालुक्यात महाआघाडीच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादीला शह देणाऱया चराटी यांना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडून वारंवार आमंत्रण दिले जात आहे. कारखान्यावरील शेतकरी मेळाव्या दरम्यानही ही बाब पुढे आली. यावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी अध्यक्ष म्हणून मी उपस्थित आहे, निर्णय जाहीर करा असा सूचक सल्ला दिला. मात्र चराटी यांनी सावध भूमिका घेत आजऱयात काम करीत असताना आपण शिवसेना, भाजपा, चराटी गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेऊन काम करीत आहे. यामुळे माझी हाती कोणता झेंडा आहे हे मलाच माहिती नाही. आपण भाजपमध्ये नाही पण सोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: