|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कॅशलेस गोवा… देशभक्ती-देशसेवेचा नवा आयाम

कॅशलेस गोवा… देशभक्ती-देशसेवेचा नवा आयाम 

गोव्यातील साक्षरता, आर्थिक क्षमता तसेच बदलास सामोरे जाण्याची गोवेकरांची मानसिकता या सर्वांचा विचार करुनच ‘कॅशलेस ट्रान्झेक्शन स्टेट’ साठी मोदींनी गोव्याची निवड करून गोव्याचा सन्मानच केलेला आहे. गैरसोय, अडचणी, संताप, फजिती हे सारे सहन करत गोवा कॅशलेस टॅन्झेक्शनकडे वेगाने जात आहे.

नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला चांगला पंतप्रधान लाभला आहे, किंबहुना जनतेने तो स्वतः मिळविला आहे. कारण निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांना जाहीर केले होते. जनतेने अप्रत्यक्षपणे थेट त्यांना पंतप्रधान बनविण्यासाठी मतदान केले आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून गेल्या सुमारे अडीच वर्षांत त्यांनी जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान करत देशाची सेवा केली आहे. केवळ आपल्या बोलण्यातूनच नव्हे तर कृतींमधूनही त्यांनी आपण देशाचा सेवक असल्याचे सिद्ध केले आहे. जगात देशाचा गौरव वाढविणे, त्यासाठी सर्वांगीण सामर्थ्य प्राप्त करणे, दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, साधनसुविधांच्या विकासाबरोबरच मानसिक विकास व्हावा, बाह्य़ स्वच्छतेबरोबरच अंतर्मनातील स्वच्छताही व्हावी, यासाठी मोदी यांच्यात असलेली तळमळ त्यांच्या प्रत्येक निर्णयातून दिसून येत आहे. त्यांचे निर्णय ऐतिहासिक ठरलेले असून अलिकडेच घेतलेला विमुद्रीकरण व डिजिटल पेमेन्टचा निर्णय काळय़ा धनाबाबत क्रांतिकारी ठरला आहे. त्यातून देश ‘लेस कॅश ट्रान्झेक्शन’ कडे जात आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी हा निर्णय घेतल्यानंतरच्या अनेक अडचणींवर मात करत जनता पंतप्रधानांच्या या निर्णयाला साथ देत आहे, ते देशप्रमापोटी आणि स्वतःमधल्या प्रामाणिकपणामुळे. लोकांनी रोख व्यवहार अत्यल्प करावेत. बहुतांश व्यवहार ‘कॅशलेस’ करावेत. संपूर्ण देशात तसे व्हावे, असे पंतप्रधानांचे स्वप्न असून सव्वाशे कोटी जनतेच्या देशात ते साकार होताना दिसतही आहे. स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी गोव्याची प्रथम निवड केली आहे आणि त्यानुसार गोवा पहिले कॅशलेस व्यवहार करणारे राज्य ठरण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.

देशात प्रायोगिक तत्वावर ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्या गोव्यात किंवा दिल्लीत केल्या जातात. ‘लेस कॅश ट्रान्झेक्शन’ साठीही मोदींनी गोव्याची निवड करुन गोव्याचा सन्मानच केलेला आहे. हा क्रांतिकारक बदल घडवून आणण्याची क्षमता गोमंतकीयांमध्ये आहे, हे त्यांनी ओळखले हा सन्मानच आहे. गोव्यात भाजपची राजवट आहे, किंवा कुण्या नेत्याची क्षमता पाहून मोदींनी हा निर्णय घेतलेला नाही. गोव्यातील जनतेची व्यापक साक्षरता, आर्थिक शिक्षण, आर्थिक क्षमता, दैनंदिन आर्थिक व्यवहार, जीवनशैली, उत्पन्न व खर्चाचे वैविध्य अशा अनेक बाबींबरोबरच कोणत्याही बदलास सामोरे जाण्याची गोवेकरांची मानसिकता या सर्वांचा विचार करुनच गोव्याची निवड झालेली आहे. व्यक्ती असो समाज किंवा राष्ट्र असो, प्रत्येकाच्या गुणात्मक विकासासाठी काळाच्या प्रवाहानुसार बदल घडविणे हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. काळाचा प्रवाह आणि त्याच्या गतीप्रमाणे बदलावेच लागते. अन्यथा कॅलेंडरवरील शतके पुढे सरकतात, पण समाज, राष्ट्र मात्र अनेक शतके मागे सरकलेले असते. इतिहासकाळापासून गोव्याने काळाप्रमाणे स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणून स्वतःला जगाबरोबर ‘अप डेट’ ठेवलेले आहे. ‘लेस कॅश ट्रान्झेक्शन’ मध्ये गोवा वेगाने अप डेट होत आहे

‘लेस कॅश ट्रान्झेक्शन’ हा बदल गोव्यासाठी तसा नवीन नाही. गेल्या दहा वर्षांपासून एटीएमचे जाळे शहरांमध्येच नव्हे तर गावांमध्येही असल्याने पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डचा वापर अधिक होत आहे. पेट्रोलपंप, फार्मसी, गोवा बागायतदारसारख्या संस्था, हॉटेल्सच्या ठिकाणी डेबिट कार्ड स्वायपिंगही सुरु होते. तीनचार वर्षांपासून सरकारी खात्यांमध्ये आर्थिक व्यवहार ऑनलाईन एनएफटीद्वारे केले जातात. पर्यटन खात्याचे व्यवहार शंभर टक्के कॅशलेस झालेले आहे. मोठय़ा रकमेसाठीच नव्हे तर छोटय़ा रकमेसाठीही धनादेश, डिमांड ड्राफ्ट्स देणे आणि स्वीकारणे गेली अनेक वर्षे सुरु आहे. गोव्याची ही एवढी तयारी अगोदरच आहे. आता खासगी स्तरावर हे प्रमाण वाढायला हवे आणि ते वाढण्यात फार मोठय़ा अडचणी नाहीत. एकेकटय़ाच्या हाती दोनदोन अँड्रॉईड मोबाईल अन् चारचार सीम कार्ड असणाऱयांच्या या गोव्याला ‘लेस कॅश ट्रान्झेक्शन’ शक्य नाही, असे कोण म्हणेल? दिल्लीतला चायवाला, ठेलेवाला, जलेबीवाला, पनीरवाला जर मोबाईद्वारे पाच रुपये अन् दहा रुपये स्वीकारतो तर गोव्यातील मासेविपेते, भाजीवाले, दुकानदार का स्वीकारु शकणार नाहीत? गोव्याला हे सर्वकाही शक्य आहे, हे जाणूनच पंतप्रधानांनी गोव्याची निवड केलेली आहे.

आता गरज आहे ती बँकांनी आपल्या दुकानदार, हॉटेलचालक ग्राहकांना स्वायपिंग मशिन्स द्यायला हवीत. पेट्रोलपंपवर स्वायपिंगचे प्रमाण वाढवायला हवे. कदंबसह खासगी बसवाल्यांना स्वायपिंग सुरु करता येईल. मोबाईलधारकांनी सरकारच्या ‘भिम’ ऍपद्वारे व्यवहार केले तर मग विचारुच नका. अत्यल्प रोख व्यवहार करणारे गोवा पहिले राज्य ठरणारच. 8 नोव्हेंबरपासून आजपर्यंतचा प्रवास पाहिला तर तो खूप समाधानकारक आहे. अर्थात त्यासाठी गैरसोय, अडचण, संताप, फजिती हे सारे गोवेकरांनी सहन केले आहे. 

देशाला पोखरुन टाकणारी समांतर ‘काळी अर्थव्यवस्था’ (ब्लॅक इकॉनॉमी) नेस्तानाबूत करण्यासाठी, दहशतवादाला रोखण्यासाठी, महागाई नियंत्रित करण्यासाठी, आपली कष्टाची प्रामाणिक कमाई बँकेत राहण्यासाठी आणि एकंदरीत राष्ट्रासाठीची बांधिलकी जपण्यासाठी आपल्याला हे करावेच लागेल. विदेशांमध्ये फक्त टुरिझम करुन न येता कॅशलेससारख्या तेथील काही चांगल्या गोष्टी आत्मसातही करायला हव्यात. कॅशलेसमुळे आवश्यक तेवढाच खर्च करण्याची सवय लागून आपल्या पैशांची मोठी बचत होणार हा स्वतःचा सर्वात मोठा फायदा होईल. कॅशलेस व्यवहार हा देशभक्ती-देशसेवेचा आजच्या काळातील नवा आयाम आहे. जे केवळ स्वतःचाच विचार करतात आणि मोदींना शिव्या देतात त्यांनी हा स्वतःच्या बचतीचाच मुद्दा तरी विचारात घेतला आणि कॅशलेशच्या प्रक्रियेत सहभागी झाले तरी मोठी देशसेवा होईल!