|Friday, December 6, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » माफी मागण्याने संबंध सुधारले असते

माफी मागण्याने संबंध सुधारले असते 

जपानचे पंतप्रधान शिन्झो ऍबेनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात पर्ल हार्बरची भेट घेतली. अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर जपानच्या युद्ध विमानानी 1941 च्या सात डिसेंबरला भयंकर हल्ला केलेला. अमेरिकेचं कंबरडं मोडण्यासाठी हा हल्ला करण्यात आलेला. जपाननी केलेल्या अचानक हल्ल्यात अमेरिकेची 18 जहाजे उद्ध्वस्त झाली. 188 विमानांना प्रचंड नुकसान झालं किंवा संपूर्णरित्या उद्ध्वस्त झाली. 2,403 जण मृत्यू पावले. अमेरिकेनी जपानला धडा शिकवण्याचा निर्धार केला. अमेरिकेनी त्यानंतर सहा व नऊ ऑगस्ट 1945 रोजी अनुक्रमे हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. जपाननी शरणागती पत्करली. मानव इतिहासातील हा काळ अत्यंत भयंकर होता. अमेरिकेने पहिल्यांदा अण्वस्त्राचा वापर केला. तेव्हा अण्वस्त्राची संहारक शक्ती जगाच्या लक्षात आली. परत हिरोशिमा, नागासाकी नको अशा घोषणा आता जगभर दिल्या जातात. आज जगात अण्वस्त्रधारी देशांची संख्या वाढत आहे. अण्वस्त्रांची संख्या प्रचंड वाढली आहे. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे.
ऍबेच्या सोबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामादेखील होते. पर्ल हार्बरवर चढविलेल्या हल्ल्यांबद्दल ऍबेनी दिलगिरी व्यक्त करण्याचं टाळलं. मात्र, त्यांनी जपान यापुढे कधीही युद्धाची सुरुवात करणार नाही, असं सांगितलं. पर्ल हार्बरच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या जवानांना त्यांनी आदरांजली वाहिली. यापूर्वी मे महिन्यात बराक ओबामानी हिरोशिमाची भेट घेतलेली. राष्ट्राध्यक्ष असताना हिरोशिमाची भेट घेणारे ओबामा पहिले अमेरिकन. अणुबॉम्ब टाकण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचं ओबामानी पण टाळलं होतं. जगात अशा स्वरूपाचा संहार कुठेही होणार नाही, याची आपण सगळय़ानी काळजी घेतली पाहिजे असं सांगून ओबामानी मृत्यू पावलेल्या लोकांना आदरांजली दिली. हिरोशिमात जवळपास एक लाख पन्नास हजार आणि नागासाकीत 70,000 लोक अण्वस्त्राच्या हल्ल्यात मारले गेलेले.
अणुबॉम्बच्या हल्ल्यात वाचलेल्या लोकांनी अमेरिकेनी माफी मागितली पाहिजे किंवा दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अशी मागणी सतत लावून धरलेली. हिरोशिमा, नागासाकीवर करण्यात आलेला हल्ला अमानवीय होता आणि त्यात दोन्ही शहरं संपूर्णपणे उद्ध्वस्त झाली. दुसऱया विश्वयुद्धात सहभागी झालेल्या अनेक अमेरिकन जवानांनी अमेरिकेने दिलगिरी व्यक्त करता कामा नये, अशी मते मांडलेली. त्यांचं म्हणणं होतं की हिरोशिमा आणि नागासाकीवर करण्यात आलेल्या अणू-बॉम्बच्या हल्ल्यामुळे जपाननी शरणागती पत्करली आणि लांब चाललेल्या विश्व युद्धाचा अंत झाला. 15 ऑगस्ट 1945 ला जपानने शरणागती पत्करली.
ऍबेच्या बाबतीत देखील नेमकं असंच झालं. ऍबेनी पर्ल हार्बरबद्दल दिलगिरी व्यक्त केली असती तर त्यांचे अनेक समर्थक नाराज झाले असते. या समर्थकाचं म्हणणं आहे की जपानकडे पर्ल हार्बरवर हल्ला केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, ही वस्तुस्थिती असली तरी, ओबामानी हिरोशिमाची आणि ऍबेनी पर्ल हार्बरची भेट घेण्याला देखील महत्त्व आहे. पर्ल हार्बर, हिरोशिमा आणि नागासाकीवर झालेल्या हल्ल्यातून आपण शिकलं पाहिजे व भविष्यात अशा स्वरूपाच्या घटनांची पुनरावृत्ती होता कामा नये. ओबामा आणि ऍबेनी युद्धाच्या विरोधात भाषणं केली, हे महत्त्वाचं आहे.
इतिहासातून मानव समाजानी शिकलं पाहिजे आणि जो समाज शिकत नाही, तो पुढे जात नाही. ऍबे आणि ओबामानी निश्चितच एक पाऊल पुढे टाकलं आहे. पण, त्या दोघांनी त्यांच्या देशानी इतिहासात केलेल्या चुकाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असली तर अधिक चांगला संदेश गेला असता. आपल्या पूर्वजानी केलेल्या चुकाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात काही चूक नाही. किंबहुना चूक स्वीकारणारा माणूस, समाज आणि देश मोठा समजला जातो. चूक स्वीकारणं सोपं नसतं पण त्यातच माणसाची कसोटी असते.
लांब जाण्याची गरज नाही. जवळच्या बांगला देशात पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या अत्याचाराबद्दल अद्याप पाकिस्तानने माफी मागितली नाही. 1971 साली तेव्हाच्या पूर्व पाकिस्तानातील स्वातंत्र्य आंदोलन चिरडण्यासाठी तेव्हाच्या पश्चिम पाकिस्तानच्या लष्कराने तीस लाख लोकांची हत्या केलेली. सुमारे दोन लाख महिलांवर बलात्कार करण्यात आलेले, 1971 च्या डिसेंबर महिन्यात बांगलादेश अस्तित्वात आला. बांगलादेश सरकारने देखील पाकिस्तानला माफी मागण्यास सांगितले आहे. परंतु, पाकिस्तानवर त्याचा काही परिणाम झालेला नाही. पाकिस्तानात आजही अनेकजण पाकिस्तानच्या लष्कराने केलेल्या कृत्याचे समर्थन करतात.
मात्र, त्याच वेळेस काही पश्चिम पाकिस्तानच्या लोकांनी पूर्व पाकिस्तानात होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविलेला. बांगलादेशच्या लोकांची ही रास्त मागणी, अपेक्षा आहे. त्या प्रकारची अपेक्षा अमेरिका आणि जपानकडून ही आहे. बऱयाचदा सत्तेत असलेल्या लोकांना दिलगिरी व्यक्त करावी असं वाटत असलं तरी आपल्या अनुयायांना असं केल्यास काय वाटेल, असा प्रश्न पडतो आणि मग दिलगिरी व्यक्त केली जात नाही.
2013 च्या फेब्रुवारी महिन्यात ब्रिटनचे तेव्हाचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरूननी अमृतसर येथील जालियाँवाला बागला भेट दिलेली. 1919 च्या 13 एप्रिलला ब्रिटिश सैन्यांनी 700 हून अधिक भारतीयांची येथे हत्या केलेली, भारताच्या स्वातंत्र्य युद्धात जालियाँवाला बागेला विशेष महत्त्व आहे. जालियाँवाला बागेला भेट देणारे कॅमरून पहिले ब्रिटिश पंतप्रधान. स्वाभाविकच, लोकांची अपेक्षा होती की ते जालियाँवाला बाग हत्याकांडाबद्दल माफी मागतील. त्यांनी हत्याकांडाचा उल्लेख अत्यंत लज्जास्पद घटना असा केला. मात्र माफी मागण्याचं किंवा दिलगिरी व्यक्त करण्याचं टाळलं. आपल्या जन्माच्या 40 वर्षे आधी हे हत्याकांड घडले आणि तेव्हाच ब्रिटिश सरकारने त्याचा निषेध केलेला होता असं कॅमरूननी म्हटलं.
इतिहास अत्याचारानी भरलेला आहे. अशा परिस्थितीत, ज्या देशाकडून इतिहासात अत्याचार झाला असेल त्याच्याकडून जर माफी किंवा दिलगिरी व्यक्त केली गेली तर ज्या देशानी अत्याचार सहन केला त्या देशाला व तेथील जनतेला त्याचं समाधान वाटतं. कॅमरूननी माफी मागितली असती तर त्यांच्याबद्दल भारतीयांमध्ये प्रचंड आदर निर्माण झाला असता. ऍबे किंवा ओबामानी माफी मागण्याचं धाडस दाखवलं असतं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा उंचावली असती. पाकिस्तानने बांगलादेशची माफी मागितली तर त्यांचे संबंध चांगले होण्यास त्याची मदत झाली असती. मात्र, यापैकी कोणीही तशा प्रकारची हिंमत दाखवली नाही. आपण माफी मागितली तर त्याचा आपल्या देशाच्या राजकारणावर काय परिणाम होईल, मात्र त्याचाच या सगळय़ांनी विचार केला. देशातल्या प्रमुखानी संकुचित राजकारणाच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि इतिहासाच्या चुकांबद्दल माफी मागितली पाहिजे.

Related posts: