|Sunday, December 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कैकयीची भयंकर मागणी

कैकयीची भयंकर मागणी 

दशरथ राजाने मोठय़ा दु:खाने क्रोधगारात पाऊल टाकले. तिथे कैकयी जमिनीवर उसासे टाकीत लोळत आहे, असे त्याच्या दृष्टीस पडले. त्या राजास आपली लाडकी राणी अशी शोक करीत असलेली पाहून वाईट वाटले. त्याने तिला विचारले, ‘कैकेयी, तुला राग का आला आहे? माझा अपराध तर मला यत्किंचितही दिसत नाही. तुझा कोणी अपमान केला काय? तुला कोणी काही बोलले काय? माझे हे समृद्ध राज्य सर्व रीतीने तुझ्या सेवेला सादर असताना तुला कोणी दु:ख दिले? तुला काय पाहिजे आहे ते मला सांग.’

त्यावर कैकयी म्हणाली, ‘महाराज, मला कोणी दु:ख दिले नाही किंवा माझा कोणी अपमान केला नाही. परंतु मला जे पाहिजे आहे ते तुम्हीच मला देऊ शकता. ते तुम्ही मला द्याल असे वचन द्या; म्हणजे मी माझी इच्छा सांगेन.’

दशरथास विचार थोडाच पडणार! त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचे पाप नव्हते. म्हणून वाईटाची कल्पनाही त्याला सुचली नाही. तो म्हणाला, ‘प्रिये, रामाशिवाय दुसरा कोणीही मला तुझ्याहून अधिक प्रिय नाही. त्या रामाची शपथ घेऊन मी सांगतो की, तू जे मागशील ते मी तुला देईन. तुझ्या मनात जे असेल ते सांग.’

कैकयीस राजाचे हे शब्द ऐकून आनंद झाला व तिने आपले भयंकर मागणे मागण्यास आरंभ केला. ती म्हणाली, ‘महाराज, ज्या अर्थी रामाची शपथ घेऊन मला तुम्ही ‘देतो’ म्हणता, त्या अर्थी ऐका. चंद्र, सूर्य, दिवस, रात्र, सर्व देवता या सर्वास साक्षी ठेवून मी सांगते; सत्यप्रतिज्ञ, धर्मि÷, धर्मज्ञ दशरथ राजाने माझे मागणे देण्याचे कबूल केले आहे. तरी मी असे मागते की, रामचंद्राच्या अभिषेकाची जी सामुग्री तयार केली आहे, त्याच सामुग्रीने माझ्या भरताला यौवराज्याचा अभिषेक करावा, आणि रामाने वल्कले नेसून 14 वर्षे वनवास भोगावा, म्हणजे माझ्या भरताला निष्कंटक राज्य मिळेल, हीच माझी इच्छा व प्रार्थना आहे. मला तुम्ही पूर्वी जे दोन वर दिले आहेत त्याच्या पूर्ततेची मी ही आता मागणी करत आहे, नवीन काही मागत नाही. तर उठा, रामाला आजच वनवासाला धाडा, म्हणजे माझा राग शांत होईल.’

कैकयीचे ते भयंकर शब्द दशरथाच्या कानावर वीज कोसळावी तसे कोसळले. काही काळ राजा चिंताग्रस्त होऊन बसला व त्याच्या हृदयात शोकाचा वणवा पेटला. शेवटी काही वेळाने रागाच्या आवेशात दात ओठ खाऊन जसा एखाद्या सर्पाला काठीचा प्रहार बसला असता तो जोराने फुत्कार करतो, त्याप्रमाणे दीर्घ उच्छ्वास टाकून दशरथाने तिचा ‘धिक्कार, कैकयी तुझा धिक्कार असो’ या शब्दांनी धिक्कार केला, आणि दु:ख शोकाने मूर्च्छा येऊन दशरथ राजा खाली पडला.

काही वेळाने शुद्धीवर येऊन तो कैकयीला म्हणाला, ‘दुष्ट, पापिणी, कुलविध्वंसिनी! रामाने तुझे असे काय वाईट केले आहे?’

Related posts: