|Monday, December 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गडकरी, ‘त्यांना’ माफ करा!

गडकरी, ‘त्यांना’ माफ करा! 

विख्यात नाटककार, महाराष्ट्राचे शेक्सपियर असे ज्यांना संबोधले जाते त्या राम गणेश गडकरी तथा कवी गोविंदाग्रज यांचा पुण्यातल्या संभाजी उद्यानातील पुतळा हटवून मुठा नदीत टाकण्याचे जे कृत्य घडले आहे, त्याचा स्पष्ट शब्दात निषेध केला पाहिजे. महाराष्ट्रासारख्या आणि त्यातून पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात, ज्याला शिक्षणाची, कलेची राजधानी मानले जाते त्या शहरात असे घडावे हा दैवदुर्विलास आहे. साहित्य, कला क्षेत्रातल्या संस्था, संघटनांनी त्याचा तातडीने जाहीर निषेध केला हे अजून संवेदनशीलता जागी असल्याचेच लक्षण म्हणावे. ज्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले त्यांचे विचार, तत्त्वे, कार्यपद्धती काय आहेत हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्याविषयी वाद किंवा मतभेद होऊ शकतात. पण कोणता विषय कुठेपर्यंत ताणावा, काय प्रकाराने तो हाताळावा यालाही काही मर्यादा असतात. गडकरी यांच्या राजसंन्यास नाटकात चित्रित झालेले छत्रपती संभाजी महाराज हा वादाचा किंवा चर्चेचा विषय होऊ शकतो. आजवर  इतिहास अभ्यासक, साहित्य समीक्षक यानी ते काम केले आहे.  परंतु गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना करणे हा अतिरेकीपणा झाला. मराठी रंगभूमीच्या इतिहासात ज्यांची नावे आदराने घेतली जातात त्यापैकी गडकरी एक नाव आहे. त्यांना अवघे 34 वर्षांचे आयुष्य लाभले. भावबंधन, एकच प्याला या त्यांच्या नाटकांचे प्रयोग आजही सादर केले जात आहेत. हे  त्यांच्या लेखन प्रतिभेचे यश. राजसंन्यास हे त्यांचे अपूर्ण राहिलेले नाटक. गडकरींना आणखी काही वर्षांचे आयुष्य मिळाले असते तर ते पूर्ण झाले असते. पण जे आहे त्यातून गडकरी यांच्या प्रतिभेचा प्रत्यय येतो. गडकरी यांना राजसंन्यासच्या रुपाने एक महान शोकान्तिका लिहावयाची असावी असे वाटते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रात त्यांना त्याची बीजे आढळली असावीत. मात्र  संभाजीराजांच्या जीवनचरित्राचे ऐतिहासिक वास्तव काय याच्या खोलवर अभ्यासात ते गेलेले नाहीत. त्यांनी त्यांच्या स्वैर प्रतिभेतून छत्रपती संभाजी महाराज साकारले. त्यासाठी इतिहासापासून फारकत घेतली. तो त्यांचा गुन्हा असेल तर तो करणारे जगाच्या इतिहासातले ते एकमेव ठरत नाहीत. त्या न्यायाने विल्यम शेक्सपियर हा जगातला सर्वात मोठा गुन्हेगार ठरेल. इतिहासातल्या घटनांची, पात्रांची मोडतोड त्याच्याइतकी कोणत्याच नाटककाराने केली नसेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कितीतरी नाटके, कादंबऱया लिहिल्या गेल्या आहेत. ह. ना.आपटे यांच्यापासून ते रणजीत देसाई, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्यापर्यंत मोठी ऐतिहासिक साहित्य लेखनाची परंपरा  दिसून येते. या सगळ्या लेखकांचे लेखन ऐतिहासिक वास्तवाच्या आधारावर तपासून पाहिले तर त्यांनाही कदाचित गुन्हेगारांच्या यादीत टाकावे लागेल. मात्र कलेतले वास्तव आणि इतिहासातले वास्तव या दोन भिन्न गोष्टी असतात हे समाजमान्य तत्त्व आहे. इतिहास संशोधक, अभ्यासक  पुराव्यांच्या आधाराने वास्तव मांडतो. त्याचा अन्वयार्थ लावतो. कलावंत लेखक त्याच्या प्रतिभेच्या माध्यमातून मानवी जीवनाची अर्थपूर्णता किंवा निरर्थकता शोधत राहतो. त्याला इतिहास लेखन करावयाचे नसते.  या दोन भूमिकांमधल्या सीमारेषा स्पष्टपणे दाखवणे अवघड असते. त्यामुळेच अनेकवेळा नाटक किंवा कादंबरीसारख्या कलाकृतांविषयी घोटाळे किंवा गल्लती होत असतात. कलावंत किंवा लेखकाने कितपत स्वातंत्र्य घ्यावे हाही वादाचा विषय आहे. कलेतल्या स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासातल्या एखाद्या व्यक्तीचे, घटनेचे जाणीवपूर्वक चारित्र्यहनन करण्याचा किंवा विकृतीकरणाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न नाटक किंवा त्यासारख्या कलाकृतीच्या माध्यमातून केला जात असेल तर ते ही घातकच असते. मात्र राम गणेश गडकरी यांच्या मनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी काही विकृत किंवा छुपी भावना असेल असे अजिबात वाटत नाही.  पण कोण कशाचे भांडवल करेल आणि कुणाच्या भावना कशातून दुखावल्या जातील याला काही विचार, कारणच अलीकडच्या काळात दिसत नाही. समाजातल्या व्यापक सहानुभाव संपवून संकुचित विचार  रुजविण्याचे काम गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे. धर्म, जातीय अस्मिता नको इतक्या टोकदार बनवल्या जात आहेत. समाजात जे दुहीचे, फुटीरपणाचे विष पसरवले जाते आहे त्यातून साहित्यिक, कलावंतांच्या अभिव्यक्तीची कोंडी होत असल्याचे चित्र दिसते. आचार्य प्र.के. अत्रे यांच्यावर गडकरी यांचा प्रभाव होता. संभाजी उद्यानातील जो पुतळा हटवला गेला त्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले होते. या घटनेविषयी अत्रे काय म्हणाले असते याची आपण कल्पना करू शकतो. त्यांच्या खास ठेवणीतले शब्द त्यांनी वापरले असते. आपण तसे म्हणू शकणार नाही. मात्र गडकरी तुम्ही त्यांना उदार अंतकरणाने माफ करा. त्यांनी काय केले आहे हे त्यांनाच नीट कळलेले नाही. उद्यानातला तुमचा पुतळा हटविल्याने तुमच्या नाटकांची, काव्याची उंची अजिबात कमी होणार नाही. साहित्य शारदेशाच्या तारांगणातील गडकरी नावाचे नक्षत्र अढळ राहील असे आपण म्हणू शकतो. मात्र गडकरी कदाचित संजय दत्तच्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटातील महात्मा गांधीप्रमाणे म्हणाले असते.‘माझाच काय देशभरातील सगळ्याच थोर पुरुषांचे पुतळे हटवा. भिंतीवरली छायाचित्रे काढून टाका. समाजातील अनेक प्रश्न आपोआप निकालात निघतील.’ पण त्यांचे हे असे बोलणे कान आणि मन बधीर झालेल्या समाजाला ऐकू येणार नाही. पुतळ्यांचे राजकारण करणाऱयांना तर कधीच समजणार नाही. हाच तर मोठा दैवदुर्विलास आहे.

 

Related posts: