|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दुचाकी-ट्रक अपघातात विद्यार्थ्याचा गेला बळी

दुचाकी-ट्रक अपघातात विद्यार्थ्याचा गेला बळी 

प्रतिनिधी /फोंडा :

केरिया-खांडेपार येथे काँक्रिटवाहू ट्रकखाली सापडल्याने 16 वर्षीय विद्यार्थी जागीच ठार झाला. हेरंब सुभाष शेट तिळवे (रा. वरचा बाजार-फोंडा) असे त्याचे नाव असून गुरुवारी सायं. 5 वा. फोंडा उसगाव मार्गावर हा अपघात घडला.

 त्याच्या सोबत असलेला मित्र व अन्य एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले आहेत. मयत हेरंब हा फोंडय़ातील आल्मेदा हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेरंब व त्याच्या टय़ुशन वर्गातील मित्र हे दोघेही जीए 05 के 0201 या क्रमांकाच्या होंडा मायस्ट्रो या दुचाकीवरुन फोंडय़ाहून खांडेपारकडे जात होते. त्याचा मित्र गाडी चालवित होता तर हेरंब हा मागे बसला होता. केरिया येथील धोकादायक वळणावर एकमेकाना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन ट्रकांपैकी एका ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली व ते खाली कोसळले. यावेळी हेरंब हा जीए 03 एन 7605 ट्रकच्या पुढील चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला. याचवेळी उसगावच्या दिशेने चाललेल्या जीए 07 जे 3013 या क्रमांकाची अन्य एक दुचाकी या अपघातात सापडल्याने दुचाकीचालक जखमी झाला. त्याला उपचारासाठी फोंडा उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. हेरंब याचे वडिल फोंडय़ात व्यावसायिक असून तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविला आहे. निरीक्षक सुदेश नाईक यांच्या याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

Related posts: