|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुंडई तपोभूमीवर रविवारी ‘वंदे मातरम्’

कुंडई तपोभूमीवर रविवारी ‘वंदे मातरम्’ 

प्रतिनिधी /फोंडा :
सद्गुरु फाऊंडेशन आणि सद्गुरु युथ फेडरेशन यांच्यातर्फे 8 जानेवारी रोजी सायं. 4.30 वा. राष्ट्रप्रेम जागृत करणारा ‘वंदे मातरम्’ हा भव्य असा कार्यक्रम श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठ कुंडई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. अण्णा हजारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. साधारण 50 हजार जनसमुदायाची या कार्यक्रमाला उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती तपोभूमीचे पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंद स्वामिजींनी काल गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्र भावनेच्या माध्यमातून विविध जाती, समाज, संप्रदाय एकत्र यावेत व युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची भावना चेतवली जावी, या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावरील हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे स्वामीजींनी सांगितले.
राष्ट्रप्रेमी जनतेचा कार्यक्रम
‘वंदे मातरम्’ हा केवळ तपोभूमीचा कार्यक्रम नसून समस्त राष्ट्रप्रेमी जनतेचा कार्यक्रम आहे. आम्ही केवळ आयोजक आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. मान्यवरांचे विचार, मातृभूमीसाठी योगदान देणाऱया मान्यवरांचा गौरव व सामुहिक संकल्प असे या कार्यक्रमाचे स्वरुप असेल.
अण्णा हजारेंचे मार्गदर्शन
कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून त्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपादभाऊ नाईक, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित राहणार आहेत.
                                                                                                                            अनेक मान्यवरांचा सहभाग
त्याचबरोबर रिलायन्स उद्योगाचे संचालक डॉ. योगेंद्र त्रिवेदी, सिद्धाश्रम शक्ती केंद्राचे लंडनस्थित स्वामी पू. राजराजेश्वर गुरुजी, गोवा आणि दमणचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव, दिल्ली येथील जैन स्वामी आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, अखिल भारतीय इमाम संघटनेचे डॉ. इमाम उमेर, अहमद इल्यासी, वारणासी येथील अध्यात्मिक गुरु डॉ. ब्रजनंदजी महाराज, वर्ल्ड योगा कॉम्युनिटीचे अध्यक्ष जगद्गुरु डॉ. दिलीपकुमार थंकप्पन, ऑस्ट्रेलिया येथील ऑस्ट्रेलियन डेंटल प्रॅक्टीस ग्रुपचे डॉ. गुरुप्रसाद, मुंबई येथील हिरे उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष महेंद्रभाई गांधी, महाराष्ट्र भाजपाचे पदाधिकारी मनुभव त्रिपाठी, दै. तरुण भारतचे समुहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, नोएडा येथील मारवाह स्टुडिओचे संदीप मारवा, एअर इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. अमोघ शर्मा, विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, मडकई मतदारसंघाचे आमदार सुदिन ढवळीकर, तायवान येथील आंतरराष्ट्रीय योग गुरु निलेश कर्मकार, पद्मनाभ संप्रदायाचे अध्यक्ष वेदमूर्ती अमर पार्सेकर, सद्गुरु फाऊंडेशनच्या अध्यक्ष ऍड. ब्राह्मी देवी व सद्गुरु युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सूरज नाईक या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती असेल. या शिवाय काही महनीय व्यक्तीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असल्याची माहिती स्वामीजींनी दिली. सेना दलातील सैनिक व अधिकारी, राजकीय क्षेत्रातील नेते, कलाकार, उद्योजक, समाजकार्यकर्ते अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच दीड हजार संस्था या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Related posts: