|Sunday, December 15, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » प्रिय, आसाराम लोमटे

प्रिय, आसाराम लोमटे 

आसाराम लोमटे यांच्या कथेला अभिजात कथेचा दर्जा म. द. हातकणंगलेकर यांच्यासारख्या साक्षेपी समीक्षकानेही दिला. त्यांच्या मते ‘आसाराम यांची कथाशैली अचूक, अभिनव, ग. ल. ठोकळ, आनंद यादव, व्यंकटेश माडगुळकर, चारुता सागर यांना पार मागे टाकणारी. मातीतील मूळ शोधणारी, उघड करणारी, नव्या वास्तवाचे, मनाचे ठाव घेणारे चित्रण करणारी..’

 

सप्रेम नमस्कार,

शब्द पब्लिकेशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या तुझ्या ‘आलोक’ कथासंग्रहाला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याच्या निमित्ताने तुझे पत्राद्धारे अभिनंदन करताना आनंद होत आहे. अर्थात आता हे जाहीर पत्र लिहिताना तुला अरे संबोधू, की अहो, याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. कारण एखादी कितीही जवळची व्यक्ती असली, तरी सार्वजनिक जीवनात तिच्याशी संवाद साधताना अहो असे संबोधण्याचे सार्वजनिक संकेत असतात हेही मला माहीत आहे. पण तुझे लेखन वाचल्यानंतर आणि विशेषतः तुझे जगणे पाहिल्यानंतर तुला अहो-जाहोचे विशेषण लावणे म्हणजे उगाचच लेखकाला लेखकराव करण्यासारखे होईल आणि असे झालेले तुलाही आवडणार नाही, याचीही मला खात्री आहे. त्यातून मलाही तुझ्याशी मोकळा संवाद साधता येणार नाही. असो. आजकालचा जमाना सोशल मीडियाचा आहे. या काळात माणूस माणसाशी प्रत्यक्ष संवाद साधत नसताना पत्रसंवाद ही गोष्ट हद्दपारच झाली आहे. तरीही मी तुला हे पत्र लिहीत आहे.

 खरे तर या पत्रात तुझ्या कथालेखनाविषयी फारसे काही लिहायचे नाही असे मी ठरविले आहे. कारण अकादमी सन्मान प्राप्त झाला, तेव्हा मला आधी आठवले, ते तुझे साधे सरळ-मोकळे जगणे. नंतर आठवले ते ‘धूळपेरा’ मधील तुझे लेखन आणि त्यानंतर आठवले तुझे कथालेखन. (अर्थात जी गोष्ट काळाच्या ओघातही टिकून राहते, ती खरेतर उशिराच आठवते ना मित्रा…) याचे कारण हेच की तू   परभणीसारख्या विकसनशील भागात राहून पत्रकार म्हणून काम करतानाही तुझे पत्रकारितेतील शब्द साऱया मराठी मुलखात उजळून निघालेले आहेत. त्यांचा आधार सर्वदूर पसरलेल्या खेडय़ातील कष्टकरी आयाबायांना-आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या परिवाराला मिळाला आहे. जिथे बातमी संपते, तिथून तुझ्या पत्रकारितेचे लेखन सुरू होते आणि जिथे तुझ्या पत्रकारितेचे लेखन थांबते, तिथूनच तुझे कथालेखन सुरू होते आणि जिथे तुझे कथालेखन थांबते, तिथे उरते ते फक्त ओथंबलेले माणूसपण…

त्यामुळेच साहित्य अकादमीचा तुला प्राप्त झालेला सन्मान हा फक्त तुझ्या कथा लेखनाचाच गौरव नाही, तर तो तुझ्यातल्या जपलेल्या माणूसपणाचाही गौरव आहे, याची प्रचितीही तू हा सन्मान जाहीर झाल्यानंतर लगेच दिलीस. तू नेहमी वंचितांच्याच बाजूने बोलतोस. ‘नाही रे वर्गाच्या विरुद्ध आहे रे वर्ग’ असा जो सनातन संघर्ष सुरू आहे, त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न तू नेहमी करीत असतोस. यातून तुला नाही रे वर्गाची दुखरी नस शोधायची असते. ती शोधताना त्या वर्गाची आजची फक्त वेदना तुला सांगायची नसतेच, ती सांगतानाच त्या वर्गाचा भविष्यकाळ किती खडतर आहे, हेच तुला दाखवून द्यायचे असते. याची प्रचिती तुझा कथालेखनातून प्रत्ययास येते, तशी ती तुझ्या पत्रकारिता लेखनातून  आणि साध्या-साध्या बोलण्यातूनही. अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एका मुलाखतीत तू म्हटले होतेस, ‘सर्वसामान्य वंचित माणसाबद्दल बोलणे किंवा त्याच्या जगण्याबद्दल विचार करणे किंवा आस्था दाखविणे ही गोष्ट आता हद्दपार झालेली आहे.’ तशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्या या नव्या युगाने जन्माला घातलेल्या आहेत. 20-25 वर्षांपूर्वी ‘मध्यमवर्ग’ हा एका विशिष्ट समूहातील होता. आता सगळय़ाच जातींमधील शिकून स्थापित झालेली जी पिढी आहे, ती एकाच मध्यमवर्गात मोडण्याइतपत तिच्यात एकसाचेपण आलेले आहे. हे सगळे मध्यमवर्गीय जिथून येतात, तिथल्या लोकांबद्दलसुद्धा ते नीट विचार करायला तयार नाहीत. त्यामुळे भविष्यात वंचितांचे जगणे आणखी दुष्कर होत जाईल. कारण त्यांच्या बाजूने कोणी फारसे उभे राहताना दिसणार नाही!’ या वक्तव्यातून तू नेमकेपणाने तळातल्या वर्गाची हतबलता मांडलीस. आजच्या जगण्याचे अंतर्विरोध मांडलेस. तुझा कळवळा सामान्यातल्या सामान्य माणसाच्या बाजूने आहे, हेही कळलेच परंतु यातील दुसरी सर्वांत महत्त्वाची बाजू ही आहे, की कलावंताची त्याची म्हणून एक मानसिकता असते, ती जागोजागी प्रकट होताना तो आपल्या आतली गोष्ट कितीही केल्या लपवू शकत नाही. तू जेव्हा-जेव्हा बोलतोस, लिहितोस तेव्हा-तेव्हा माणसाने माणसासारखे जगावे हाच भाव तुझ्या बोलण्यात-लिहिण्यात आणि प्रत्यक्ष जगण्यातही उतरलेला दिसतो. माणसे बेगडी आयुष्य जगतात. बोलण्यात एक, जगण्यात एक आणि लिहिण्यात एक. पण याबाबत जी अपवाद आहेत, यातला तू आहेस, असेच मला नेहमी वाटत आले आहे. खरे तर आपली कधी फारशी भेट झाली नाही. अवघ्या दोन भेटीत माणूस ओळखता येतोच असे नाही. (तसे आयुष्य सोबत घालवूनही माणूस कळतो असेही नाही…) पण माणसाच्या प्रतिष्ठेच्या कल्पनेवरून माणसाचा स्वभाव आणि गुणवत्ताही कळत जातेच ना…तुझ्या परभणीला कार्यक्रमासाठी आम्ही काही कोकणातले मित्र आलो होतो. तुम्ही सर्व तेथील साहित्यिक मित्रांनी आमचा पाहुणचार चांगला केला होता. इतिहासकार डॉ. सदानंद मोरे यांच्यासोबत शहरभर विविध भागात आमचे सत्कार घडवून आणले होते. तेव्हा आम्ही म्हणालो होतो, ‘परभणी म्हटले, की आम्हाला एकच नाव आठवते ते म्हणजे कवी इंद्रजीत भालेराव.’ दुसरीकडे कोकणातून परभणीला निघताना कविता महाजनने सांगितलेले एक वाक्यही आमच्या कायम स्मरणात राहिले होते. ते म्हणजे ‘बनी तो बनी, नही तो परभणी’… पण गावी आलो आणि हे सगळेच विसरून गेल्यानंतर कायम म्हणजे आजही लक्षात राहिले ते तुझेच त्यावेळचे उद्गार….निघताना आम्ही तुला म्हणालो, ‘कार्यक्रम कसा झाला?’ यावर तू तातडीने म्हणालास…‘अरे ते जाऊ दे.’ ‘आपण दोन दिवस एकत्र आहोत पण सगळय़ा गडबडीत माझ्या घरी तुम्हाला घेऊन जाता आले नाही रे…याचेच वाईट वाटतेय…’ अर्थात तुझा हा ओलावा एखाद्या व्यक्तीपुरता नाही, तर समग्र माणसाबद्दलचा आहे हे तुझी कथा समजून घेतल्यावर कळत गेले. म्हणूनच तुझ्या कथेला अभिजात कथेचा दर्जा म. द. हातकणंगलेकर यांच्यासारख्या साक्षेपी समीक्षकानेही दिला. त्यांच्या मते ‘आसाराम यांची कथाशैली अचूक, अभिनव, ग. ल. ठोकळ, आनंद यादव, व्यंकटेश माडगुळकर, चारुता सागर यांना पार मागे टाकणारी. मातीतील मूळ शोधणारी, उघड करणारी, नव्या वास्तवाचे, मनाचे ठाव घेणारे चित्रण करणारी..’’ तू लिहिताना गहिरून येत नाहीस, तुझ्याच शब्दात सांगायचे तर तू सहृदयी निर्दयता जपतोस! अशी निर्दयता जपणे म्हणजेच जगण्याच्या वास्तवाचे भान जपणे होय! हे भान तुझासारखा कथाकार जपतो आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. तुझ्या कथालेखनातून एकूण मराठी कथाच अधिकाधिक समृद्ध होत जावो, याच तुला शुभेच्छा!

Related posts: