|Thursday, December 12, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » मनस्वी अभिनयाचे पूर्णसत्य

मनस्वी अभिनयाचे पूर्णसत्य 

आपल्या राजकारणात आणि हिंदी चित्रसृष्टीत घराण्यांना फार महत्त्व असते. राजकीय क्षेत्रात गांधी, यादव, पवार, ठाकरे इत्यादी आडनावे असली की उमेदवारी करण्याची गरज पडत नाही. सिनेमा धंद्यातही कपूर, खान अशी आडनावे असली की अंगात गुणवत्ता नसली तरी चालते. घराणेशाहीची ही भिंत फोडून काढून इथे यश मिळवणे सोपे नसते. ओम पुरी यांनी तसे यश मिळवले. उत्कृष्ट आशयगर्भ आणि गंभीर सिनेमांपासून सुरुवात करून ते नंतर व्यावसायिक चित्रसृष्टीत आले. म्हटले तर या दोन टोकाच्या चित्रप्रवृत्ती आहेत. पण ओम पुरी यांनी दोन्हीकडे आपली पक्की मांड अखेरपर्यंत कायम ठेवली. आपल्या व्यक्तिमत्त्वाने सिनेमाचा पूर्ण पडदा आणि अवकाश व्यापून टाकण्याची शक्ती फार थोडय़ा अभिनेत्यांकडे असते. या संदर्भात अमिताभ बच्चन हे नाव अजूनही अग्रभागी आहे. ओम पुरी यांच्याकडेही अशी क्षमता होती. तिचा पुरता वापर व्यावसायिक सिनेमावाल्यांनी केला असे म्हणता येत नाही. पण आर्ट फिल्म नावाने ओळखल्या जाणाऱया अनेक वास्तववादी सिनेमांमध्ये पुरी यांचे हे वैशिष्टय़ दिसून आले. त्यातील अनेक सिनेमे आज पंचवीस वर्षांनंतर केवळ पुरी यांच्या व्यक्तिरेखेमुळे लक्षात आहेत. पुरी यांचा चेहरा गोंडस नव्हता. त्यांचा आवाज खर्जातला असला तरी तो काहीसा करकरीत होता. पण पुरी यांच्याकडे भूमिकेत घुसण्याची अफलातून ताकद होती. किंबहुना, सिनेमा कितीही चांगला वा वाईट असला तरी त्यांनी रंगवलेली व्यक्तिरेखा ही अस्सलच असे. बनावट, वरवरचा, नाटकी किंवा बनचुका अभिनय त्यांना करताच येत नसे. आजच्या काळात हिंदी सिनेमात अशा अस्सल अभिनेत्यांची संख्या एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीही उरलेली नाही. ओम पुरी हे मूळचे पंजाबातले. अभिनयाच्या आवडीपोटी ते पुण्याच्या फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये दाखल झाले. नासिरुद्दीन शहा हे त्यांचे तेव्हापासूनच सहकारी होत. घाशीराम कोतवालवर आधारित सिनेमातील त्यांच्या भूमिकेने सर्वांचे सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले. पण खऱया अर्थाने त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळवून दिली ती अर्धसत्य या सिनेमाने. याचे दिग्दर्शक गोविंद निहलानी हे मूळचे छायालेखक. त्यांचा ओम पुरी हा फार आवडता अभिनेता होता. अर्धसत्यची मूळ कहाणी सांगलीच्या श्री. दा. पानवलकरांची. विजय तेंडुलकरांनी तिचा सिनेमा केला. बंदिस्त व भ्रष्ट व्यवस्थेविरोधात पोलिस अधिकाऱयाची तगमग व अखेरीला त्याने केलेले बंड असे तिचे ढोबळ सूत्र सांगता येते. हे सूत्र तसे पडद्याला सर्वस्वी नवखे नव्हते. अमिताभ बच्चनची अँग्री यंग मॅन ही प्रतिमा ज्या सिनेमाने घडवली त्या जंजीरची कहाणीही अशीच काहीशी होती. तो आणि तशाच प्रकारचे सिनेमे 1970 च्या दशकात अनेकवार येऊन यशस्वी झाले होते. पण अर्धसत्यची मांडणी एकदम वास्तववादी आणि साधी होती. यातील खलनायक रामा शेट्टी (सदाशिव अमरापूरकर) अजिबात आरडाओरड न करणारा व केवळ मोजकेच बोलणारा असा होता. हिंदी पडद्याला असा खलनायक नवीन होता. त्याच्या समोर उभा असलेला वर्दीतला अनंत वेलणकर ओम पुरी यांनी रंगवला होता. रामा शेट्टी गुंड आहे हे ठाऊक असूनही त्याच्या निवडणूक मिरवणुकीचा बंदोबस्त वेलणकरला करावा लागत होता. हा वर्दीच्या मर्यादांचा आणि नियमांचा काच ओम पुरी यांनी अप्रतिमपणे रेखित केला. अंतिमतः या काचाविरुद्धचे वेलणकराचे बंडही अमिताभप्रमाणे टाळ्या घेणारे नव्हते. उलट ते  वेडे साहस होते जे अस्वस्थ करणारे होते. त्या अंतिम क्षणांमध्ये ओम पुरी 1980 च्या दशकातील अस्वस्थ पण असहाय तरुणांची साक्षात प्रतिमा झाला. अर्धसत्यनंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पण म्हणून ते वाटेल तसे वाहातही गेले नाहीत. वेलणकर पद्धतीच्या भूमिका करण्याच्या ऑफर्स त्यांनी थेट नाकारल्या. त्यानंतर बराच काळ ते विविध प्रकारच्या भूमिका करीत राहिले. आघात या मुंबईतील कामगार संघटनांच्या राजकारणावर आधारलेल्या सिनेमातली त्यांची नायकाची भूमिका ही त्यांच्या काही अप्रतिम भूमिकांमधील एक आहे. हा नायक कट्टर डावी विचारसरणी मानणारा आणि अत्यंत नैतिकतेने वागणारा आहे. संघटनेचा नेता म्हणून तो झोकून देऊन काम करतो. पण अंतिमतः जेव्हा नासिरुद्दीन शहाच्या रूपाने हाणामाऱया करून संघटना ताब्यात घेणाऱया नेत्याचे आव्हान समोर उभे राहते तेव्हा ओममधल्या नैतिक नेत्याची कसोटी लागते. हा सिनेमा 1985 मध्ये आला. त्यावेळी मुंबईत गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप चालू होता. डॉ. दत्ता सामंत या नावाचा प्रचंड दबदबा होता व त्याने पारंपरिक डाव्या संघटनांना कोपऱयात टाकून दिले होते. ओम पुरी यांनी या भूमिकेत डाव्या संघटनावाल्यांची एक बौद्धिक शिस्त व साधी राहणी अचूक पकडली होती. एकूणच वास्तव आणि सिनेमा यांच्यातले अंतर कमीत कमी करणारा असा तो काळ होता. नासिर, शबाना आझमी, स्मिता पाटील असे त्या वास्तववादाचे चित्रचेहरे होते. पण ओम पुरी हे जणू त्याही पलीकडे त्या वास्तववादाची चित्रप्रवृत्ती बनले होते. त्यांच्या या सामर्थ्यामुळेच सत्यजित रे यांनी मुन्शी प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित सद्गती ही टेलिफिल्म बनवली तेव्हा दुखी चांभाराची भूमिका साकारायला त्यांच्यासमोर केवळ ओम यांचेच नाव होते. ओम यांना नंतर अनेक रंगाच्या व ढंगाच्या भूमिका मिळत गेल्या. विनोदी भूमिकांमध्येही त्यांनी धमाल उडवून दिली. जाने भी दो यारो ते चाची चारसो बीसपर्यंत आणि द्रोहकालपासून दबंगपर्यंत अनेक सिनेमांमध्ये ओम यांनी आपली रेंज दाखवून दिली. त्यांच्या याच क्षमतेमुळे ब्रिटीश मालिका व इंग्रजी सिनेमांमध्येही त्यांनी आपली ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केली. अलीकडच्या काळात त्यांच्या सार्वजनिक वर्तनातून काही वाद निर्माण झाले. पण तरीही भारतीय चित्ररसिक ओम यांना एक असामान्य मनस्वी अभिनेता म्हणून लक्षात ठेवतील हे पूर्णसत्य आहे.

Related posts: