|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रेल्वे सुरक्षाबलाकडून वर्षभरात प्रवासी सुरक्षेवर भर

रेल्वे सुरक्षाबलाकडून वर्षभरात प्रवासी सुरक्षेवर भर 

कणकवली : गेल्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा बलाकडून कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱया प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी उल्लेखनिय कामगिरी झाली आहे. घरातून न सांगता निघून आलेल्या 45 मुलांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दारूची अवैध वाहतूक करणाऱया 32 जणांवर कारवाई तर 10 गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळविले. तर रेल्वेप्रवासात मद्यपी, हुल्लडबाजी करणारे, गर्दीत चोरी करणारे यांच्यावर विशेष लक्ष ठेवताना सुरक्षा बलाने विविध स्थानकांवर धडक मोहीम वर्षभरात राबविल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे मुख्य आयुक्त ए. एन. सिन्हा यांनी दिली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते मेंगलोर या 739 कि. मी. रेल्वे मार्गाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा बलाकडून गेल्या वर्षभरात विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्याविषयी मुख्य आयुक्त ए. एन. सिन्हा यांनी माहिती दिली.

सिन्हा म्हणाले, कोकण रेल्वे मार्गाच्या या भागात नियमितपणे 122 गाडय़ा ये – जा करतात. या गाडय़ांमधील प्रवाशांना प्रवासादरम्यान सुरक्षितता वाटावी, यासाठी विविध स्थानकांवर सुरक्षा बलाकडून अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. त्याचेच फलित म्हणून वर्षभरात सुमारे 45 मुलांना ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यातील बहुतांशी मुले ही घरातून न सांगताच पळालेली होती. रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱयांनी जागरुकता दाखवित या मुलांना ताब्यात घेत त्यांच्या नातेवाईकांकडे सुपुर्द केले आहे.

कोकण रेल्वेतून अवैधरित्या वाहतूक करणाऱया सुमारे 32 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 6 हजार 830 बाटल्यांमधून पाच लाख 26 हजार 382 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. कोकण रेल्वे मार्गावर वेगवेगळय़ा गुन्हय़ांमध्ये समावेश असलेल्या दहा गुन्हेगारांना पकडण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश मिळाले आहे. या गुन्हेगारांकडून रेल्वे प्रवाशांचे चोरलेले आयफोन, मोबाईल, लॅपटॉप असे एक लाख 47 हजार 516 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. तर मंगला एक्सप्रेसमधून 23 लाख 22 हजार 830 रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड घेऊन जाणाऱया संशयिताला ताब्यात घेऊन त्याला स्थानिक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले. कर्नाटक येथील भटकळ रेल्वेस्थानकावर ही कारवाई करण्यात आली.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी 182 हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रवाशांचे कॉल आल्यानंतर तातडीने सुरक्षापर उपाययोजना करण्यात रेल्वे सुरक्षा बल नेहमीच सतर्क राहिले. प्रवाशांकडून मदतीसाठी कॉल आल्यानंतर तातडीने कारवाई करत काही पाकिटमार, चोरटे यांना ताब्यात घेत गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यात यश मिळाले आहे. को. रे. मार्गावरील सुमारे 90 स्थानकांवर ही कारवाई करण्यात आली.

रेल्वे सुरक्षा बलाकडे कमी प्रमाणात मनुष्यबळ असतानाही कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया मेल एक्सप्रेस, पॅसेंजर, मालगाडय़ा, रो – रो, हॉलिडे स्पेशल, या गाडय़ांच्या सुरक्षितेसाठी कडक उपाययोजना करण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश मिळाले आहे, असेही सिन्हा म्हणाले.

Related posts: