|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अखेर अतुल बंगेंच्या हाती शिवसेनेचा भगवा

अखेर अतुल बंगेंच्या हाती शिवसेनेचा भगवा 

कुडाळराष्ट्रवादी काँग्रेसपासून गेली तीन-चार वर्षे अलिप्त असलेले तालुक्यातील वालावल मतदारसंघातील पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत येथे अखेर शिवसेनेत जाहीर प्रवेश करीत भगवा हातात घेतला. चेंदवण येथील काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष प्रशांत तेंडोलकर यांनीही कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधले.

बंगे गेली तीन-चार वर्षे राष्ट्रवादीपासून अलिप्त होते. मागील विधानसभा-लोकसभा निवडणुकीत ते शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या संपर्कात होते. आज येथील दैवज्ञ भवनात आमदार नाईक यांच्या उपस्थितीत त्यांनी सेनेत अधिकृत प्रवेश करून चर्चेला पूर्णविराम दिला. याप्रसंगी एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष सुशिल चिंदरकर, नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर व सचिन काळप, छोटू पारकर, नागेंद्र परब, तेंडोली विभागप्रमुख संदेश प्रभू, नितीन सावंत, दीपक आंगणे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

वैभव नाईक म्हणाले, शिवसैनिक पक्षाशी निष्ठावंत असतो. तो पदासाठी नाही, तर पक्षासाठी काम करतो. नारायण राणे यांचा आपण पराभव केला. त्यात येथील जनतेने आपल्यावर विश्वास दाखविला. बंगे यांनी हुमरमळा परिसरात वर्चस्व ठेवले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही त्यांनी सेनेला सहकार्य केले. आज त्यांनी व तेंडोलकर यांनी सेनेत प्रवेश केला आहे. या जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात निश्चितच सेनेचे मताधिक्य वाढणार आहे. त्यांना पक्षात योग्य मानसन्मान देऊन त्यांचा विश्वास सार्थकी ठरवू.

बंगे म्हणाले, सध्याचे पालकमंत्री, खासदार, मंत्री सर्वसामान्यांना येथे पाहायला मिळतात. नाईक यांनी गोरगरिबांचा आमदार म्हणून ओळख निर्माण केली. काँग्रेस पक्षाचे काम करून चेंदवण गाव विकासापासून दुर्लक्षित राहिला. त्यामुळे पक्षावर तेंडोलकर नाराज होते. यापुढे आपण शिवसेनेत सक्रिय होऊन शिवसैनिक म्हणून मतदारसंघ एकसंघ ठेवण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. संजय पडते व अभय शिरसाट यांनीही मनोगत व्यक्त केले. तेंडोली उपविभागप्रमुखपदी एम. बी. गावडे (गोवेरी) यांची निवड जाहीर करण्यात आली.

                                                        बंगे यांचा कार्यकर्त्यांसह प्रवेश

बंगे यांच्या नेतृत्वाखाली हुमरमळा (वालावल) सरपंच सुरेश वालावलकर, माजी सरपंच अर्चना बंगे, ग्रामपंचायत सदस्या रेणुका परब, मनाली पेडणेकर व श्रृतिका दळवी तसेच अमृत देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. त्यामुळे हुमरमळा ग्रामपंचायतीवर आता सेनेचा भगवा फडकला आहे.

                                                       काँग्रेसला तेंडोलकर यांचा रामराम

चेंदवण येथील काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष तेंडोलकर यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यांच्यासह चेंदवणच्या माजी उपसरपंच प्रणाली तेंडोलकर, ग्रामपंचायत सदस्या शारदा ठुंबरे, माजी सरपंच भरत गुरव, गणपत घाडी, राजू पोयरेकर व अन्य कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला. आमदार नाईक यांनी या सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले.

Related posts: