|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न करणार!

पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न करणार! 

कुडाळकुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे-रेल्वेफाटक येथे उड्डाण पूल किंवा भुयारी मार्ग व्हावा, या ग्रामस्थांच्या मागणीनुसार कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक बाळासाहेब निकम (रत्नागिरी) यांनी जागेवर येऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत अंदाजपत्रकही सादर केले जाईल. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.

गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे फाटक ग्रामस्थांना अडचणीचे ठरत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून उड्डाण पूल किंवा भुयारी मार्गाची मागणी आहे. पण रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अलिकडे तेर्सेबांबर्डे ग्रामस्थ एकवटले. यासंदर्भात रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री. निकम यांची ग्रामस्थांनी रत्नागिरी येथे भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी तेर्सेबांबर्डे रेल्वे फाटक येथे भेट दिली. त्यांनी संपूर्ण परिसराचा सर्व्हे केला.

चर्चेत ग्रामस्थांनी आपल्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या. फाटकामुळे भेडसावणाऱया एकंदर परिस्थितीची माहिती त्यांना दिली. बहुतांश लोकवस्तीचा हा गाव असून तुमची मागणी रास्त आहे. तुमच्यावर अन्याय झाला आहे. पर्यायी व्यवस्थेबाबत आपल्या स्तरावर प्रयत्न केले जातील. लवकरच अंदाजपत्रक सादर केले जाईल. तसेच जिल्हाधिकारी यांनाही याबाबतचा अहवाल पाठविणार, अशी ग्वाही निकम यांनी दिली. ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: