|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मायक्रो फायनान्सच्या कर्जाच्या हप्त्यांसाठी मुदतवाढ द्या

मायक्रो फायनान्सच्या कर्जाच्या हप्त्यांसाठी मुदतवाढ द्या 

प्रतिनिधी/ कागल

कागलमधील महिलांनी विविध मायक्रो फायनान्सकडून कर्जाऊ रक्कम घेतली आहे. त्याचे हप्ते आतापर्यंत वेळेवर भरलेही आहेत. नोटाबंदीच्या काळातही  हप्ते भरुन महिलांनी सहकार्य केले आहे. आता चलन तुटवडा असल्याने आम्हाला हप्ते भरण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशा मागणीचे निवेदन महिलांनी तहसीलदार किशोर घाडगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. पवार यांना दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फायनान्स कंपनीचे कर्मचारी महिलांनी त्रास देत आहेत. घरातील वस्तु विकणे, महिलांना दिवसभर बसवून अपशब्द वापरणे, गट तयार करताना ठराविक व्यक्तीला टार्गेट करुन सभासद जमा करुन देणे हा मुद्दा अध्यक्षांच्या जीवावर ठेवून फायनान्स कर्मचारी कागलमध्ये दहशत माजवत आहेत. तसेच कर्ज घेतलेल्या महिला कष्टकरी आहेत. दिवसभर मोलमजुरी केल्याशिवाय त्यांची चूल पेटत नाही. त्यांना दिवसभर बसवून घेऊन त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. फायनान्स कंपनीच्या दहशतीला भिऊन कांही महिला आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर कांही शहर सोडून गेल्या आहेत.

महिलांमुळे अशा फायनान्स कंपनींना मोठा फायदा होत असतो. मात्र वारंवार या कंपन्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. महिलांच्या घरी जावून दारात दंगा करणे असे प्रकार घडत आहेत. यासाठी फायनान्स कंपन्यांनी कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अन्यथा कांही प्रसंग घडल्यास याला फायनान्स कंपन्या जबाबदार असतील. कागल तालुक्यात प्रत्येक गावात असे प्रकार होत आहेत.

यावेळी विद्या धुमाळ, आफरीन नायकवडी, साबेरा नायकवडी, सुमित्रा सुतार, रुक्साना जमादार, शाहीन जमादार, मुमताज तांबोळी, जयश्री सावंत, सुरेखा जाधव, वंदना खाडे आदी महिला उपस्थित होत्या. 

Related posts: