|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माजीमंत्री अजितराव घोरपडे आता राष्ट्रवादी समवेत

माजीमंत्री अजितराव घोरपडे आता राष्ट्रवादी समवेत 

प्रतिनिधी/ मिरज

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माजीमंत्री आणि भाजपानेते अजितराव घोरपडे कोणती भुमिका घेणार? याकडे मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यासह जिह्याचे लक्ष लागले होते. त्यांच्या भुमिकेवरुन भविष्यातील निकालाची अटकलेही लढविली जाऊ लागली होती. गेल्या आठ दिवसांत घोरपडे यांनी राष्ट्रवादीचे नेते, आमदार जयंत पाटील यांच्या समवेत अनेक विकास कामांच्या उद्घाटनांना हजेरी लावून आपण राष्ट्रवादीसोबत राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. आणि तशा स्वरुपाने आता हालचालीही गतीमान झाल्या आहेत.

स्व. राजारामबापू पाटील यांच्या जिह्यातील काही कट्टर समर्थकांमध्ये अजितराव घोरपडे यांची गणणा होते. त्यांनी जनता पक्षाच्या माध्यमातून बापूंचे विचार घेऊन कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूकही लढविली होती. त्यानंतर त्यांनी याच मतदार संघातून ‘सिंह’ या चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जावून राजकीय नशीब आजमाविण्याचा प्रयत्न केला होता. पण दोन्हीही वेळा त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले होते. पण त्यांनी आपला संघर्षी बाणा सोडला नव्हता. याच त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक राजकीय कार्यकर्ते त्यांच्याकडे खेचले गेले होते. यातून कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात पक्षविरहित विकास आघाडीचा उदय झाला होता.

याच विकास आघाडीच्या नावावर कवठेमहांकाळचा ‘सुर्य’ विधानसभेत धडकण्यात यशस्वी ठरला होता. ही विकास आघाडी जिल्हाभर नावारुपाला आली. त्याचा राज्यभर व्याप वाढविण्याचा घोरपडे यांचा मानसही त्यांनी बोलून दाखविला होता. या कालावधीत स्व. विष्णुआण्णा पाटील यांच्याशी त्यांची चांगलीच जवळीक झाली होती. त्यानंतर त्यांनी दोनवेळा काँग्रेसच्या चिन्हावर विरोधकांना नामोहरण करीत विधानभवन जवळ केले होते. पण स्व. मदन पाटील यांच्याशी त्यांचे फारकाळ जमले नसल्याने त्यांना काँग्रेसचा त्याग करावा लागला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीशी जवळीक साधली. मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही त्यांनी राष्ट्रवादी सोबत लढविल्या. पण येथेही स्व. आर. आर. पाटील यांच्याशी त्यांचे फारसे जमले नाही.

आर. आर. पाटील यांच्याशी असलेला राजकीय विरोध पराकोटीला गेल्याने त्यांची सध्याचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याशी जवळीक निर्माण झाली. मागीलवेळेस कवठेमहांकाळ-तासगांव विधानसभा मतदार संघाची नव्याने निर्मिती झाल्याने आर. आर. पाटील यांना शह देण्यासाठी संजय पाटील यांच्या संगतीने घोरपडे यांनी ‘कमळ’ जवळ केले होते. तेव्हापासून ते आजतागायत भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणूनच राजकीय पटलावर ओळखले जातात. पण कवठेमहांकाळ विधान परिषद निवडणुकीत मात्र, त्यांनी भाजपाला चार हात लांब ठेवून राष्ट्रवादीच्या श्रीमती सुमनताई पाटील आणि स्व. विजय सगरे यांच्याशी जवळीक करुन स्वाभिमानी आघाडीचा पर्याय पुढे केला होता. त्यामध्ये त्यांना घवघवीत यशही मिळाले.

Related posts: