|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पाण्यासाठी कार्यालयातच ठिय्या आंदोलन

पाण्यासाठी कार्यालयातच ठिय्या आंदोलन 

प्रतिनिधी/ आटपाडी

आटपाडी तालुक्यातील बनपुरी-कचरेवस्ती तलावात शेतीसाठी पाणी सोडण्याच्या मागणीने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप घेतले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी लघु पाटबंधारे कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पाटबंधारे, महसुल व पोलीस प्रशासनाने पाणी सोडण्याच्या केलेल्या प्रयत्नांना शेतकऱयांनी तीव्र विरोध दर्शविला. सायंकाळी प्रांताधिकाऱयांनी अधिकाऱयांसह पाणी सोडण्यास विरोध करणाऱयांची तहसील कार्यालयात बैठक घेवुन तोडग्याचा प्रयत्न केला.

बनपुरी-कचरेवस्ती तलावातील पाणी शेतीसाठी सोडण्यात आले होते. त्याला स्थानिक शेतकऱयांनी विरोध केल्याने ते पाणी बंद झाले. आता शेतकऱयांसह विविध राजकीय मंडळीने ते पाणी सोडण्यासाठी आग्रह धरला. प्रशासनाने पाणी सोडण्याचा प्रयत्न केला. परंतू पाणी सोडण्यास विरोध असणाऱयांनी आक्रमक भुमिका घेतली. त्यातच प्रशासनाने बोटचेपी भुमिका स्विकारल्याने बनपुरी तलावातील पाण्याचा प्रश्न पेटला.

शुक्रवारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी शेतकऱयांच्या मागणीनुसार लघु पाटबंधारे कार्यालयातच ठिय्या मारला. बनपुरी तलावातील मागणी असणाऱया शेतकऱयांना पाणी द्या, अशी मागणी करत जोपर्यंत पाणी सुटणार नाही. तोपर्यंत उठणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे लघु पाटबंधारेचे माळी, केंगार यांच्यासह प्रशासनाची तारांबळा उडाली. अमरसिंह देशमुख यांनी टेंभुचे पाणी सर्व शेतकऱयांना मिळाले पाहिजे. पिण्याचे पाणी आरक्षीत ठेवुन लोकांची गैरसोय न करता पाणी देता येते. ते द्यावे, अशी मागणी केली.

लघु पाटबंधारेच्या अधिकाऱयांनी आटपाडी पोलीस ठाण्यात धाव घेवुन पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याची तयारी केली. परंतू पाणी सोडण्यास विरोध करणाऱयांमध्ये महिलांची संख्या जादा असल्याने महिला पोलीसांची गरज पोलीस अधिकाऱयांनी व्यक्त केली. थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांशी संवाद साधत महिला पोलीस मागण्यात आल्या. दुपारी प्र.तहसीलदार डी.आय.मुल्ला, सपोनि सुधाकर देडे, लघु पाटबंधारेचे अधिकारी व पोलीस फौजफाटा पाणी सोडण्यासाठी तलावावर पोहचला. परंतू तेथे शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी विरोधाची भुमिका कायम ठेवली. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी सज्जतेने गेलेली मंडळी मोकळय़ा हाताने परतली.

पोलीस प्रशासनाने अमरसिंह देशमुख यांच्यासह अधिकाऱयांशी लघु पाटबंधारे कार्यालयात संवाद साधला. परंतु चुकीच्या पध्दतीने पाणी अडविण्याचा प्रकार सुरू असून मागणी करणाऱयांना शेतकऱयांचे पाणी द्या. अशी मागणी करत आपला निर्धार अमरसिंह देशमुख यांनी स्पष्ट केला. युवक नेते हर्षवर्धन देशमुख, भागवत माळी, ऋषिकेश देशमुख, सभापती सौ.सुमन देशमुख, महादेव पाटील, विलास नांगरे, पंढरीनाथ नागणे, महिपतराव पवार, अरूण बालटे, विठ्ठल पुकळे यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांमुळे पाटबंधारे कार्यालय परिसराचे स्वरूप बदलले.

Related posts: