|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » उत्तरेत थंडीचा कहर; महाराष्ट्रही गारठला

उत्तरेत थंडीचा कहर; महाराष्ट्रही गारठला 

थंडीच्या लाटेने वातावरण गारेगार

पुणे / प्रतिनिधी

 उत्तरेत होत असलेला हिमवर्षाव आणि पावसामुळे देशात सर्वत्र किमान तापमानाचा पारा खाली आला असून, मध्य तसेच दक्षिण भारतातील काही भागात थंडीची लाट पसरली आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंडमध्ये होणारा हिमवर्षाव कायम असून, पुढील दोन ते तीन दिवसांत वायव्येकडील राज्यातही थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. परिणामी महाराष्ट्रातही हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शनिवारी राज्यात नाशिक येथे 7.3 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, किमान तापमानात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. नगरमध्ये हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद होत पारा पाच अंशांपर्यंत पोहचला, तर पुण्यातही हंगामातील कमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे व नगर ही दोन शहरे थंडगार बनली आहे.

 उत्तरेकडील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागात हिमवर्षाव होत आहे. तसेच या भागातील राज्यातही थंडीची लाट पसरली आहे. हे वारे देशभर पसरत असल्याने देश थंडीच्या लाटेच्या प्रभावाखाली आला आहे. या भागात ही स्थिती कायम राहणार आहे, तर दोन दिवसांनंतर पंजाब, हरियाणा, राजस्थान तसेच उत्तर प्रदेशमध्येही किमान तापमानाचा पारा घटण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तवला आहे. भारतात इतरत्रही तापमान कायम राहणार आहे.

दक्षिण-मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकात थंडीची लाट

 उत्तरेकडून येणाऱया थंड वाऱयांमुळे महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच कर्नाटकात थंडीची लाट पसरली आहे. उत्तर कर्नाटकात थंडीचा कडाका आहे. तर दक्षिण-मध्य महाराष्ट्रातही थंडीची लाट आहे. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे, तर कोकण-गोव्यातही किंचित घट झाली आहे. रात्रीबरोबरच दिवसाही थंडीचा अनुभव लोकांना येत आहे. दोन दिवस ही थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

 शनिवारी राज्यातील विविध शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे : मुंबई 20, सांताक्रूझ 15.9, अलिबाग 16.8, रत्नागिरी 17.5, डहाणू 16.6, भिरा 14, पुणे 7.8, जळगाव 8, कोल्हापूर 12.1, महाबळेश्वर 12.6, मालेगाव 9, सांगली 10.5, सातारा 8.5, सोलापूर 11.3, औरंगाबाद 11.1, परभणी 11.3, अकोला 11.8, अमरावती 9.6, बुलढाणा 13.8, ब्रह्मपुरी 12, चंद्रपूर 14, गोंदिया 12, नागपूर 10.7, वाशिम 12.2, वर्धा 11.6, यवतमाळ 14.4, पणजी 17.5.

Related posts: