|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » . अफवांच्यावर विश्वास ठेऊ नये

. अफवांच्यावर विश्वास ठेऊ नये 

वार्ताहर/ भिलवडी

भिलवडी घटनेतील आरापी कोणत्याही जाती धर्माचा नाही तो अद्याप आमच्या ताब्यात नाही. अफवांच्यावर विश्वास ठेऊ नये. असे आवाहन कोल्हापूर परिअंगाचे पोलीस आयुक्त विश्वासनांगरे पाटील यांनी केले.

भिलवडी (ता. पलूस) येथील 14 वर्षीय आल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचा तोंड दाबून खून झाल्याचे समजते. या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलीस यंत्रणा रात्र-दिवस कामाला लागली आहे. जिल्हा पोलीस प्रमुख भिलवडी ठाण्यात ठाण मांडून बसले आहेत. लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल. ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांच्यावर विश्वास ठेऊ नये. आरोपी कोणत्याही जाती-धर्माचे नाहीत. ते अद्याप आमच्या ताब्यात नाहीत. यामुळे ग्रामस्थांनी जातीय सलोखा ठेऊन पोलीसांना सहकार्य करावे, असे मत कोल्हापूर परिअंगाचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी भिलवडी येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे, तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, विटा उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह निंबाळकर उपस्थित होते. पुढे विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, झालेली घटना नींदनीय आहे. मुलीच्या घरची परिस्थिती गरीबीची आहे. मयत मुलगीला वडील नाही. लहान बहीण आणि आई असा त्यांचा परिवार आहे. आई मजूरी करुन घर चालविते. मुलगी सायंकाळी आठच्या सुमारास घरातून आई बरोबर भांडण करुन  बाहेर पडली. मुख्य रस्त्यावरुन जात असताना तिचा घात-पात झाला असावा आणि तिच्यावर अत्याचार करुन आणून हायस्कूलजवळ मृतदेह फेकुन दिला असावा. त्या अनुशंगाने रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या सुमारे वीस किलोमीटर अंतरावरील असणारे सर्व सी. सी. टी. व्ही. कॅमेऱयांची फुटेजची तपासणी केली जाईल. तर संशयीत म्हणून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीवरील अत्याचारासंदर्भात शवविच्छेदन करतेवेळी सरकारी पंचासहीत तिन डॉक्टर उपस्थित होते. तोंडावर उशी ठेऊन अगर श्वासोश्वास कोंडून खून झाला असावा असे प्रथम दर्शनी स्पष्ट झाले आहे. शरीरावर कोठेही खुण नसून हातावर खरचटले आहे. बलात्काराच्या संशयाने 376 कलम या गुह्यासाठी वापरण्यात आले आहे. मृतदेह उकीरडय़ाकडेला दगडात व पाल्यात टाकल्याने डॉग स्कॉडचा तपास करण्यात आला. तर वेगवेगळय़ा परिस्थितीजन्य पुराव्याने पाच टीम करुन वेगवेगळय़ा दिशेने तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी मयत मुलगीच्या पाठीमागे एक मुलगा त्रास देत होता. त्याला व त्याच्या मित्रांना संशयीत म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत आरोपी सापडले असून ते विविध जाती-धर्माचे आहेत. असा तर्क-वितर्क काढून काही लोकांनी सोशल मिडीयावरती कमेंट पोस्ट केल्या आहेत. त्या सर्व चूकीच्या आहेत. अशा काही पोस्ट करणाऱया लोकांचे फोन नंबर पोलीस ठाण्यात पाठवा. त्यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत कारवाई केली जाईल. या प्रकरणात जास्तीत-जास्त गतीने तपास यंत्रणा कामाला लावली आहे. लवकरच आरोपींना ताब्यात घेतले जाईल.

कोण काय म्हणाले

खा. संजयकाका पाटील –

पोलीस यंत्रणेचा तपास गतीने चालू आहे. आरोपी अद्याप ताब्यात नाहीत. कोणत्याही अफवांच्यावर विश्वास ठेऊ नये आणि जतीय व धर्मीय दंगलीच्याबाबत मोबाईलवरती पोस्ट करु नये, असे आवाहन त्यांनी केले.

स्मिता पाटील, राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्षा –

अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार हा गृह खात्याचे अपयश आहे. राज्यात ही दुसरी मोठी घटना आहे. दिवसा ढवळय़ा मुलींच्यावर अत्याचार करुन रस्त्याच्याकडेला फेकले जात आहे. आजही जिह्यात महिला सुरक्षीत नाहीत. यासाठी पोलीसांनी कोणत्याही दबवाला बळी न पडता निपःक्ष तपास करावा.

डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री –

शिवाजी महाराजांच्या काळात महिला सुरक्षीत होत्या. परंतु शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणाऱया सरकारच्या काळात आज महिलांच्या सुरक्षीततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कोपर्डी सारख्या घटनेची पुर्नावृत्ती वारंवार होत आहे. सरकार यावर काय निर्णय घेणार, अशा गुन्हेगारांना जलदगती न्यायालयात खटला चालवून तात्काळ फाशी द्यावी.

सदाभाऊ खोत, पणन मंत्री –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी व तपासाबाबतची अधिक माहिती घेण्यास मला पाठविले आहे. जे आरोपी असतील त्यांना कोर्टाद्वारे फास्टटॅकवर गुन्हा चालवून जलद शिक्षा देण्याच्या हालचाली सरकारने गतीमान केले आहे. सध्या प्राथमिक तपास प्रगती पथावर आहे. सरकार याबाबत गांभीर्याने दखल घेऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. पोलीसांनी तपासात कसूर न करता आरोपेंना लवकरात लवकर ताब्यात घेणे गरजेचे आहे.

भिलवडी पोलीस ठाण्यात या गुह्याच्या तपासासाठी दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखासह आठ पी. एस. आय., एक ए. पी. आय. यांच्यासह दोनशेहुन अधिक पोलीस फौजफाटा परिसरात दाखल आहे. भिलवडी, माळवाडी, अंकलखोप, वसगडे, ब्रम्हनाळ, खटाव या गावात दिवसभर बंद पाळून निषेध व्यक्त केला.

Related posts: