|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरज चर्चच्या ताबावादातून दोन गटात तणाव

मिरज चर्चच्या ताबावादातून दोन गटात तणाव 

प्रतिनिधी/ मिरज

शहरातील मिरज ख्रिश्चन चर्चमधी ताबावादातून रविवारी दोन गट आमनेसामने झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. परिणामी पोलिस बंदोबस्तात रविवारी मुख्य प्रार्थना पार पडली. दिवाणी न्यायालयाने नुकताच या चर्चचा ताबा अध्यक्ष श्रीनिवास मोहिते यांच्याकडे द्यावा, असे आदेश दिले होते. 

शहरातील मंगळवार पेठेत 125 वर्षेहून अधिक काळ कार्यरत असलेल्या मिरज ख्रिश्चन चर्चच्या ताब्यावरुन अध्यक्ष श्रीनिवास मोहिते आणि नथानियल लोंढे यांच्यात वाद होता. यातून हाणामारीचे प्रकारही घडले होते. लोंढे यांनी चर्चचा ताबा घेतल्याने मोहिते यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 2014 मध्ये मोहिते यांच्या बाजूने निर्णय दिला होता. लोंढे यांनी याविरुध्द जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले होते. सदरचे अपिल फेटाळून मोहिते यांना मिळालेला हुकूम कायम करण्यात आला होता. असे असतानाही मोहिते यांना चर्चमध्ये हस्तक्षेप करण्यास अडथळे येत होते.

सध्या दिवाणी न्यायालयाने पोलिसांना आदेश देऊन मिरज ख्रिश्चन चर्च पब्लिक ट्रस्टच्या पूर्वेकडील भागाकडे असणारे कार्यालयाची कुलूपे काढून सदरचा ताबा श्रीनिवास मोहिते यांच्याकडे द्यावा, असे आदेश नुकतेच दिले होते. याशिवाय 24 डिसेंबरपासून 31 जानेवारीपर्यंत या ठिकाणी पोलिस बंदोबस्तही देण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 न्यायालयाने दिलेल्या या आदेशानुसार मोहिते यांनी गेल्या आठवडय़ात चर्चचा ताबा घेतला होता. रविवारी आठ जानेवारी रोजी सकाळी रविवारच्या मुख्य प्रार्थनेसाठी ख्रिश्चन बांधव चर्चमध्ये जमले होते. यावेळी मोहिते यांच्या बाजूचे पाळक यांच्या नेतृत्त्वाखाली प्रार्थना करण्यास दुसऱया गटातील व्यक्तींनी आक्षेप घेतला. त्यामुळे वादाला सुरूवात झाली. प्रकरण हातघाईवर आले. त्यामुळे चर्च परिसरात तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूचे लोक मोठय़ा संख्येने जमले होते. त्यामुळे अतिरिक्त पोलिस मागवून घेण्यात आले. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात प्रार्थना करावी लागली. चर्चच्या इतिहासात पोलिस बंदोबस्तात प्रार्थना करण्याचा हा प्रकार पहिल्यांदाच घडत असल्याने काही ज्येष्ठ ख्रिश्नच बांधवांनी या वादाबाबत नाराजी व्यक्त केली.

Related posts: