|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » फ्लॅट विक्रीच्या वादातून निवळीतील ‘त्या’ अज्ञाताचा खून

फ्लॅट विक्रीच्या वादातून निवळीतील ‘त्या’ अज्ञाताचा खून 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात कोकजेवठार येथे सडलेल्या स्थितीत आढळलेल्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. नवी मुंबईतील रहिवाशाचा हा मृतदेह असून फ्लॅट विक्रीच्या वादातून त्यांचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी
पाचजणांना अटक केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणी सचिन शिवाजी कदम, अनिल गुणी नाहक, जयदीप जगमोहन खत्री, महेंद्र शांताराम मेस्त्री, जिंदा जिलानी मुल्ला अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर कोकजेवठार येथे 16 जूनला 2016 ला एका 50 वर्षीय व्यक्तीचा सडलेला मृतदेह आढळून आला होता. ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. त्या व्यक्तीचा मृत्यू 8 ते 10 दिवसांपूर्वी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला होता. मृताचा चेहरा पूर्णत: सडलेला असल्याने ओळख पटणे शक्य नव्हते. अंगावर पट्टेरी रंगाची पॅन्ट, पायाकडील बाजूही पूर्णपणे सडलेली होती. मृतदेहावर गोणपाटे असल्याने त्याची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. आकस्मिक मृत्यू कि हत्या, या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

ग्रामीण पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी राज्यभर फोटो पाठवले होते. नवी मुंबई येथे एक व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यातील माहितीमधील कपडे आणि निवळी कोकजेवठार येथील मृताच्या अंगावरील कपडे हे मिळतेजुळते होते. नवी मुंबई पोलिसांनी रत्नागिरीत येऊन त्याची खात्री केली. नातेवाईकांना कपडे दाखवल्यानंतर त्याची ओळख पटली. त्यांचे नाव संजय सीताराम गायकवाड (वय 50) असल्याचे तपासातून पुढे आले होते. पुढील तपासामध्ये त्याचा खून झाल्याचे पुढे आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई येथे गायकवाड यांचा फ्लॅट होता. त्यामध्ये सचिन कदम, अनिल नाहक, जयदीप खत्री, महेंद्र मेस्त्री, जिंदा मुल्ला हे भाडय़ाने राहत होते. त्यानंतर तो फ्लॅट गायकवाड यांनी विक्रीस काढला. त्या विक्रीच्या व्यवहारातून वाद निर्माण झाले होते. त्यातून त्या पाचजणांनी 9 जून 2016 रोजी संजय गायकवाड यांचे नवी मुंबई येथून अपहरण केले. प्रवासादरम्यान त्यांची गळा दाबून हत्या केली गेल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्या पाचजणांनी निवळी कोकजेवठार येथे मृतदेह गोणपाटात टाकून दिला. त्यानंतर ते पाचही जण मुंबईला निघून गेले. तपासादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी संजय याची हत्या केल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी त्या पाचहीजणांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Related posts: