|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रक्तचंदन शोधासाठी होणार कोम्बिंग ऑपरेशन!

रक्तचंदन शोधासाठी होणार कोम्बिंग ऑपरेशन! 

प्रतिनिधी./ चिपळूण

कोटय़वधी रूपयांची रक्तचंदन तस्करी प्रकरणात ठोस कारवाई होताना दिसत नसली तरी आता पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाची पाळेमुळे खणण्याच्यादृष्टीने वनविभागाने पावले उचलली आहेत. रक्तचंदनाचे आणखी साठे असल्याच्या शक्यतेने कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, रक्तचंदनाचा साठा केल्या प्रकरणी दोन जागा मालकांना वनविभागाने नोटीसा पाठवल्या आहेत.

गेल्या आठवडाभरात शहरातील गोवळकोट रोड परिसरात चार ठिकाणी धाडी टाकून एकूण 9.796 घनमीटरचे 412 रक्तचंदनाचे ओंडके ताब्यात घेण्यात आले. सुमारे 14 टन वजनाच्या या चंदनाची किंमत भारतीय बाजारभावाप्रमाणे 1 कोटी 71 लाख 76 हजार आहे. मात्र परदेशातील त्याची किंमत कित्येक कोटीत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाच्या साठय़ांमध्ये चिपळुणातील कारवाई सर्वात मोठी आहे. या प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या इसा हळदे यांना दोन नोटीसा पाठवण्यापलिकडे अद्याप कारवाई पुढे सरकलेली नाही. हळदे फरार असल्याने पुढील धागेदोरेही हाती लागेनासे झालेले आहेत.

†िवविध ठिकाणी रक्तचंदन आढळून आल्यानंतर या परिसरात आणखीही साठा दडवून ठेवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादृष्टीने सोमवारी परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख व पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी पुढील तपासाच्या दृष्टीने चर्चा केली. यामध्ये आणखी साठय़ाचा शोध घेण्यासाठी लवकरच कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यासाठी चिपळूणसह दापोली, रत्नागिरी परिक्षेत्र वन कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी तसेच पोलीस अशा 50जणांचे पथक तैनात करण्यात येणार आहे. याबाबतची पूर्ण आखणी करून छापे टाकले जाणार आहेत.

दरम्यान, या गुन्हय़ासाठी ज्या जागा वापरल्या गेल्या त्याचे सातबारे व नकाशे महसूल विभागाने वनविभागाला यापूर्वीच दिलेले आहेत. त्यामुळे सलीम मेमन व अल्ताफ चिकटे या दोन जागा मालकांकडून याबाबत खुलासा करण्याबाबत नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. अन्य जागा मालकांनाही नोटीसा पाठवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. पुढील टप्प्यात ज्याठिकाणी रक्तचंदनाचे साठे सापडले त्या सर्व जागा जप्त करण्याच्या दृष्टीनेही कारवाई सुरू झाल्याची माहिती परिक्षेत्र वनाधिकारी सचिन निलख यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

चौकट

Related posts: