तवसाळ खाडीत मृतावस्थेत सापडला पाच फुटी डॉल्फीन

तवसाळ / वार्ताहर/
गुहागर तालुक्यातील तवसाळ-जयगड खाडीमध्ये पाच फुट लांबीचा डॉल्फीन मासा मृतावस्थेत सापडला असून सायंकाळी उशिरा चिपळूण येथील वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले.
गुहागर समुद्राबरोबरच जयगड व दाभोळखाडी ही ठिकाणे डॉल्फीन माशांमुळे पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहेत. गुहागर समुद्र, तवसाळ व जयगड खाडीमध्ये मोठय़ाप्रमाणात डॉल्फीन मासे आढळून येतात. सोमवारी सकाळी जयगड खाडीमधून तवसाळ येथील फेरीबोट सेवेच्या ठिकाणी हा मासा मृतावस्थेत वाहत आला. दुपारच्यादरम्यान काही पर्यटकांनी या माशाला समुद्रकिनारी आणले. यानंतर नीलेश सुर्वे यांनी गुहागरचे वनपाल सुधाकर गुरव यांना या डॉल्फीनबाबत माहिती दिली. यानंतर चिपळूण व गुहागर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी सायंकाळी उशिरा रवाना झाले आहेत. डॉल्फीनचा मृत्यू नक्की कशामुळे झाला असावा याचा अंदाज अजूनही येत नसून शक्यतो मार लागल्यामुळे तो मृत झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.