|Sunday, September 22, 2019
You are here: Home » उद्योग » हिऱयांचेही मार्चपासून होणार टेडिंग

हिऱयांचेही मार्चपासून होणार टेडिंग 

वृत्तसंस्था/ मुंबई

इंडियन कमोडिटी एक्स्चेंज (आयसीईएक्स) मार्च महिन्यापासून हिऱयांचे (डायमन्ड) ट्रेडिंग करणार असल्याची माहिती मंगळवारी देण्यात आली. यामुळे निर्यातदारांना चांगली आर्थिक मदत होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात हिऱयांना तकाकी (पॉलिश) आणण्याचे काम केले जाते. सध्या जगातील 15 हिऱयांपैकी 14 हिऱयांना तकाकी आणण्याचे काम भारतात केले जाते.

भारतात हिऱयांचे टेडिंग करण्यासाठी बाजार नियामक सेबीने परवानगी दिली आहे. फिचर ट्रेडिंगमध्ये 0.3 कॅरेट, 0.5 कॅरेट आणि 1 कॅरेटच्या हिऱयांचे ट्रेडिंग करण्यात येणार आहे. भारतात हिऱयांचे ट्रेडिंग करण्यात आल्याने देशातील निर्यातीला प्रोत्साहन मिळेल. याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारतीय स्पर्धेला अधिक वाव मिळणार आहे, असे आयसीईएक्सचे व्यवस्थापकीय संचालक संजित प्रसाद यांनी सांगितले. बाजारातील गुंतवणूकदारांच्या मागणीनुसार किमती निर्धारित करण्यात येणार आहेत आणि डीलीव्हरी केंद्र सुरतमध्ये असणार आहे. गुजरातच्या सुरतमध्ये जगातील 80 टक्के हिऱयांना तकाकी आणण्याचे काम केले जाते.

एप्रिलपासून नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत हिऱयांच्या तकाकी करण्याच्या प्रमाणात आणि कट करण्यात गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत 12.2 टक्क्यांनी वृद्धी होत उलाढाल 15.4 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, असे जेम्स ऍन्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिलने सांगितले होते. मात्र नोटाबंदी करण्यात आल्यानंतर गेल्या दोन महिन्यात लहान कंपन्यांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला आहे.