|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ले नगराध्यक्षांविरोधातील अपिलावर 13 रोजी सुनावणी

वेंगुर्ले नगराध्यक्षांविरोधातील अपिलावर 13 रोजी सुनावणी 

सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप यांनी नगराध्यक्ष होण्यापूर्वी नगर पालिकेत क्रीडा साहित्याचा ठेका घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावर नगराध्यक्ष पदासाठी अपात्रतेची कारवाई करण्यात यावी आणि दोन नंबरची मते आपल्याला मिळाल्याने विजयी म्हणून घोषित करावे, असे अपील अपक्ष उमेदवार सुनील डुबळे यांनी जिल्हाधिकाऱयांकडे केले आहे. या अपिलावर 13 रोजी जिल्हाधिकाऱयांनी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

वेंगुर्ले नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजन गिरप विजयी झाले होते. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांपैकी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सुनील डुबळे यांना दोन नंबरची मते मिळाली होती. दरम्यान डुबळे यांनी गिरप यांच्या नगराध्यक्ष निवडीला आक्षेप घेतला असून गिरप यांनी निवडणूक लढविण्यापूर्वी पालिकेकडून क्रीडा साहित्याचा ठेका घेतला होता. ही बाब त्यांनी लपवली होती तसेच या ठेक्यामुळे त्यांचे हितसंबंध दिसून येत असल्याने गिरप यांना नगराध्यक्ष पदावरून अपात्र ठरावावे आणि आपल्याला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोन नंबरची मते मिळाल्याने आपल्याला विजयी घोषित करावे, असे अपील अपक्ष उमेदवार सुनील डुबळे यांनी जिल्हाधिकाऱयांकडे दाखल केले आहे. डुबळे यांनी नगराध्यक्ष गिरप यांच्याविरोधात केलेले अपील जिल्हाधिकाऱयांनी दाखल करून या अपिलावर 13 जानेवारीला सुनावणी ठेवली आहे.