|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शोभिवंत माशांच्या जापनीज, चायनीज खाद्याला आता भारतीय पर्याय!

शोभिवंत माशांच्या जापनीज, चायनीज खाद्याला आता भारतीय पर्याय! 

प्रतिनिधी / रत्नागिरी

शोभिवंत माशांना केवळ जापनीज व चायनीज खाद्याचा पर्याय उपलब्ध असताना रत्नागिरीतील ‘एम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी अस्सल भारतीय पर्याय उपलब्ध करून दिला आहे. एका कृती संशोधन प्रकल्पाद्वारे त्यांनी हे सिद्ध केले असून त्यांचा हा प्रकल्प जिल्हा, विभागीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अव्वल ठरत आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

आज बहुतांश घरात, ब्युटीपार्लर्स, हॉस्पिटल्स, हॉटेल्समध्ये शोभिवंत माशांचा ‘फिश टँक’ पहायला मिळतो. या ‘फिश टँक’मधील माशांना खायला घालण्यात येणारे विशेष खाद्य हे जापनीज व चायनाकडून येते. भारतात हे खाद्य बनवण्यात येत नसल्याचे संशोधनाअंती जाणून घेऊन रत्नागिरीतील ‘एम.एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी भारतीय पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

नॅशनल चिल्ड्रन्स सायन्स काँग्रेस यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या विज्ञान प्रकल्पात ‘एम.एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी आपला प्रकल्प सादर केला. जिज्ञासा ट्रस्ट-ठाणेतर्फे या विज्ञान प्रकल्पासाठी जुलै 2016 मध्ये शाळेला माहिती प्राप्त झाली. यासाठी ‘सायन्स टेक्नॉलॉजी ऍण्ड इनोव्हेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ अशी थीम देण्यात आली होती. यासाठी ‘एम.एस. नाईक प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल’ने फुड ऍण्ड ऍग्रीकल्चर विषय निवडत ‘इनोव्हेटीव्ह फिश फिड’ अशा शिर्षकाखाली शोभिवंत माशांच्या खाद्याचा प्रकल्प तयार केला.

हा प्रकल्प शाळेतील 6 वीचे विद्यार्थी मुस्तफा उमर जांभारकर, दानिया जावेद मुल्ला, हदिया इरशाद जांभारकर, शारिया जमीर होडेकर, अर्शद समीर मजगावकर यांनी शिक्षिका आरिफा कमालुद्दीन मालदार, सहकारी जैबा अब्दुल रहमान काझी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला. तसेच त्यांना डॉ.स्वप्नजा मोहिते आणि कोल्हापूर-वडगावचे तज्ञ डॉ.सुर्यकांत म्हस्के यांचे सहकार्य लाभले. तर शाळेचे सेक्रेटरी अशफाक नाईक, डायरेक्टर नोमान नाईक, चेअरमन मुहम्मद सिद्दिकी नाईक, मुख्याध्यापिका स्नेहल रहाटे यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.

या प्रकल्पाच्या संशोधनासाठी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. बाजारात सहज उपलब्ध होणारा गाजर, बीट, कोबी भाजीपाला, तसेच गोंडय़ाची फुले या खाद्यासाठी निवडण्यात आली. त्यांचा रस काढून त्यात भाताचा कोंडा, गव्हाचे पीठ, सोयाबीनची पावडर मिसळण्यात आली. यात फिश टँकमध्ये खाली बसलेल्या गाळाची तयार करण्यात येणारी ‘स्पीरूलीना पावडर’ही मिसळण्यात आली व त्याचे पीठ तयार करण्यात आले. ते उन्हात वाळवून त्याचे विशिष्ट प्रक्रियेद्वारे खाद्य तयार करण्यात आले. स्पीरूलीना पावडर मिसळण्यात आल्यास हे खाद्य अधिक काळ टीकू शकते. तर ही पावडर न मिसळताही खाद्य किमान 6 ते 7 महिने टीकत असल्याचे संशोधनाअंती मांडण्यात आले आहे.

खाद्य तयार केल्यानंतर 2 समान फिश टँक घेऊन त्यात प्रत्येकी 3-3 स्वर्डटेल आणि गोल्ड फिश असे एकूण 6 मासे टँकमध्ये सोडण्यात आले. त्यातील एका टँकमधील माशांना बाजारातील खाद्य तर दुसऱयामधील माशांना विद्यार्थ्यांनी तयार केलेले खाद्य 15 दिवस देण्यात आले. 15 दिवसानंतर या माशांची तपासणी केली असता मुलांनी तयार केलेले खाद्य देण्यात आलेले मासे लांबी व वजनालाही बाजारातील खाद्यापेक्षा सरस ठरल्याचे दिसून आले. मुलांनी तयार केलेल्या खाद्यामुळे माशांची वाढ उत्तम झाल्याची प्रत्येक गणिती नोंद प्रकल्पामध्ये सविस्तररित्या मांडण्यात आली आहे. विशेष म्हणजे बाजारातील खाद्य किलोला 650 ते 1805 रूपये आहे. तर विद्यार्थ्यांनी तयार केलेले खाद्य केवळ 500 रूपये किलो रूपयांनी पडते आहे. शोभिवंत माशांची सविस्तर माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी फिशरीज कॉलेज, प्रभा गार्डन, परकार हॉस्पिटल, प्रभा हॉटेलमध्ये भेट दिली.

राष्ट्रीय स्तरावर ‘टॉप 15’मध्ये निवड

या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर ‘ए-प्लस’ ग्रेड मिळाली आहे. जिल्हा व विभागीय स्तरावर निवड झाल्यानंतर हा प्रकल्प यवतमाळ येथे राज्यस्तरावर मुस्तफा उमर जांभारकर व दानिया जावीद मुल्ला यांनी सादर केला. राज्यस्तरावर एकूण 169 प्रकल्प सादर झाले होते. त्यातून केवळ 24 प्रकल्प राष्ट्रीय स्तरासाठी निवडण्यात आले. यामध्ये नाईक हायस्कूलच्या प्रकल्पाची निवड झाली. त्यानंतर 27 ते 31 डिसेंबर दरम्यान बारामती येथे विद्या प्रतिष्ठान इन्स्टिटय़ुट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण झाले. संपूर्ण देशातून या ठिकाणी 647 प्रकल्प सादर झाले होते. यामध्ये 53 प्रोजेक्ट एशियन व गल्फ देशातून होते. या सर्व दिग्गजांना मात देऊन नाईक हायस्कूलच्या अंतिम 30 मध्ये धडक मारली आणि त्यातील मानाच्या ‘टॉप 15’ मध्ये स्थान मिळवले. यासाठी देशपातळीवरील तज्ञ संशोधकांनी परीक्षण केले. राष्ट्रीय स्तरावरील ‘टॉप 15’ मध्ये स्थान मिळवल्यानंतर या विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी मुस्तफा उमर जांभारकर याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरूपात गौरवण्यात आले.

Related posts: