|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रत्नागिरी, संगमेश्वरमधील मोबदला वाटप फेब्रुवारीत

रत्नागिरी, संगमेश्वरमधील मोबदला वाटप फेब्रुवारीत 

प्रतिनिधी / रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रक्रियेला लवकरच चालना मिळणार आहे. रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात 381 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. आणेवारी व हिस्सेदार निश्चित करण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात मोबदला वाटपाचे काम सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची भूसंपादन प्रक्रिया वेगाने होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाने रत्नागिरीसाठी 203 कोटी रुपये तर संगमेश्वरसाठी 178 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहेत. चौपदरीकरणासाठी रत्नागिरी, संगमेश्वरमधील 34 गावांमधील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यात रत्नागिरी तालुक्यातील 50.74 हेक्टर जमिनीचा समावेश आहे. त्यातील 30.65 हेक्टर जमिनीचा निवाडा जाहीर करण्यात आला असून त्यांना मोबदल्याचे वाटप केले जाणार आहे.

या जमिनीचे थ्रीडी ऍवार्ड जाहीर करण्यात आले आहे. उर्वरित 20.9 हेक्टर जमिनीचे थ्रीडी ऍवार्ड जाहीर झालेले नाहीत. ते काम युध्दपातळीवर सुरु आहे. यामध्ये काही ठिकाणी बायपासचाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्या जमिनी अधिग्रहित करताना शासनकडून विचार केला जाऊ शकतो. संगमेश्वर तालुक्यातील 61.39 हेक्टर जमीन चौपदरीकरणासाठी घेण्यात येणार आहे. त्यातील 41.86 हेक्टर जमिनीचा निवाडा जाहीर केला आहे. उर्वरित 20 हेक्टर जमिनीचा निवाडा जाहीर केलेला नसल्याने त्यातील जमीन मालकांना मोबदल्याचे वाटप या टप्प्यात होणार नाही. केंद्र शासनाकडून दोन्ही तालुक्यांसाठी 381 कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.

भूसंपादन प्रक्रिया झालेल्या जमिनीचा मोबदला वाटप फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरु होण्याची शक्यता आहे. सध्या आणेवारी, हिस्सेदार यांची यादी तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सातबाऱयावरील हिस्सेदार निश्चित करुन त्यांच्यामध्ये मोबदला हिस्स्याप्रमाणे वितरित होणार आहे. ती यादी तयार झाल्यानंतर धनादेश वाटप सुरु केले जाईल. त्यासाठी भूसंपादन केलेल्या गावांमध्ये मोबदला वाटप शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्याची माहिती नोटीसीद्वारे संबंधित ग्रामस्थांना दिली जाईल. धनादेश वाटप हे प्रांताधिकारी कार्यालयामार्फत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related posts: