|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उमेदवारीचा ‘सस्पेन्स’,अन् शिवसेनेत खद्खद

उमेदवारीचा ‘सस्पेन्स’,अन् शिवसेनेत खद्खद 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे रणांगण राजकीय पक्षांना खुणावत आहे. सर्वच राजकीय पक्षांतून इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून एका पायावर उभे आहेत. आजही मात्र काही गट, गण वगळता अजूनही इच्छुक उमेदवारांच्या उमेदवारीवर राजकीय पक्षांकडून शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ आजही कायम राहिला आहे. या उमेदवारी निवडीवरून अन्य राजकीय पक्षांपेक्षा शिवसेनेमध्येच अंतर्गत बंडखोरी उफाळून येण्याचे दाट संकेत दिसून येत आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती अशक्य बनली आहे. रत्ना†िगरी विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील उमेदवारांसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार चाचपणी करण्यात आली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी यांच्यामध्येच एकमेकांसमोर मातब्बर उमेदवार देण्याविषयी चाचपणीला वेग आला आहे. काही जागांवर या राजकीय पक्षांकडून उमेदवारही निश्चित झाले आहेत. पण अजूनही त्या बाबत अधिकृत घोषणा कोणत्याच पक्षांकडून करण्यात आलेली नसल्याचे सांगितले जात आहे.

या निवडणुकांमध्ये जास्तीत-जास्त जागांवर वर्चस्व मिळवण्यासाठी या राजकीय पक्षांमध्ये जोरदार चढाओढ लागली आहे. त्यासाठी तोडा-फोडीचे राजकारणाचे खलबते सुरू झाले आहेत. विधानसभा मतदार संघात सद्या शिवसेनेच्या झंझावाताचा बोलबाला सुरू आहे. त्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. तर राष्ट्रवादीकडून जनमत आजमावण्यासाठी जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. आमदार उदय सामंतांच्या शिवसेना प्रवेशानंतर आजही राष्ट्रवादीची नाव रत्नागिरीत तरलेली नाही. काँग्रेसही चाचपपडतच पावले उचलत आहे.

नवीन रचनेनुसार रत्नागिरीत जिल्हा परिषद गटांची संख्या 10 असून पंचायत समिती गण 20 झाले आहेत. वाढीव गण व गण ही शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडणारी गोष्ट आहे. शिवसेनेत नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना या वाढीव मतदारसंघातून संधी देणे शक्य होणार आहे. त्याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी गण, गटांचे झालेला आरक्षण बदलाचा अनेक इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले. पण हक्काचा गट, गण गेला तरी दुसऱया गणातून उमेदवारीवर कब्जा करण्यासाठी शिवसेनेतच जोरदार चुरस निर्माण झाली आहे. त्यातच एकाच गटातून अनेक इच्छुकांपुढे शिवसेनेत गढूळ वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

इच्छुक उमेदवारांची चर्चा झाली. स्थानिक नाही तर बाहेरच्या उमेदवाराला संधी द्यायची, असेही नियोजन काही गटात झाले आहे. त्यामुळे इच्छुक स्थानिकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरणार आहे. त्याचा उद्रेक आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होण्याची दाट चिन्हे आहेत. तालुक्यात करबुडे, पावस, गोळप, हरचिरी, नाचणे, हातखंबा, शिरगाव, कोतवडे, वाटद, मिरजोळे हे जिल्हा परिषदेचे गट आहेत. त्यामध्ये भाजपात इच्छुकांमध्ये चढाओढ नाही, पण शिवसेनेतील उमेदवारीच्या चढाओढीने जोरदार राजकारण तापले आहे.

पावस गटात उमेदवारीवरून अंतर्गत गटबाजीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्या ठिकाणी काही इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्ष पदाधिकाऱयांकडे प्रस्तावही ठेवला. पण त्यांना अर्ज देण्यास टाळाटाळ केल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. काहींनी या गटात आपल्या राजकीय अस्तित्वासाठी उमेदवारीसाठी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला. पण या गटातील मतदारांनीच त्या उमेदवाराला विरोधाचा ठराव करून बाहेरचा मार्ग दाखवला असल्याचे बोलले जात आहे.

नाचणे गणातही शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. मला की तुला यासाठी राजकीय चुरस उमेदवारांमध्ये सुरू आहे. हरचिरी गणातही तशीच स्थिती उभी आहे. त्या ठिकाणी इच्छुक महिला उमेदवारांच्या निवडीकडे साऱयांचे लक्ष वेधले आहे. शिरगांव, मिरजोळे येथेही इच्छुक उमेदवारांमध्ये ही स्थिती काही वेगळी नाही. केवळ घोषणेची औपरचारिकता बाकी राहिली आहे. त्यामध्ये वरिष्ठांची कोणावर मर्जी कोणावर उदार होणार, याचीही चर्चा सुरू आहे. कोणता उमेदवार कोणाच्या बाजूचा यावरही उमेदवारांवर शिक्कामोर्तब होणार आहे. जर या अंतिम उमेदवार निवडीत हिरमोड झाला तर बंडाचे निशाण फडकावण्यासही काहींनी तयारी केली आहे. अशा नाराजांना गळाला लावण्यासाठी भाजपाकडून नेमक्या संधीची वाट शोधली जात आहे.

।।।।।,

Related posts: